‘ससुराल सिमर का’ फेम टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. दीपिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर अनेक गोष्टी शेअर करत असते. अशातच तिने अभिनयक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावर दीपिकाने स्पष्टीकरण दिलं आहे.
एका मुलाखतीत दीपिकाने प्रसूतीनंतर आई व गृहिणी म्हणून जीवन जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तिने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले होते. “गरोदरपणाचा काळ मी खूप एन्जॉय करत आहे. आमच्या पहिल्या बाळाच्या आगमनासाठी आम्ही उत्सुक आहोत. मी जवळपास १०-१५ वर्षांपासून सतत काम करत आहे. “गरोदरपणात मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. मला आता काम करायचं नाही, असं मी शोएबला सांगितलं. एक गृहिणी व आईप्रमाणे मला आयुष्य जगायचं आहे,” असं तिने या मुलाखतीत म्हटलं होतं.
आता मात्र दीपिकाने आपण तसं म्हटलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ईटाईम्स टीव्ही’शी बोलताना दीपिका म्हणाली, “मला नुकतीच माझ्याबद्दलची बातमी कळली की मला अभिनय करिअर सोडायचे आहे. मला अभिनय करायचा नाही, हा मुद्दा लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतला आहे. मला नेहमीच गृहिणी व्हायचं होतं. शोएबने ऑफिसला जावं आणि मी त्याच्यासाठी नाश्ता बनवावा आणि घराची काळजी घ्यावी, पण याचा अर्थ असा नाही की मला पुन्हा काम करायचे नाही. पुढील ४-५ वर्षे मला काम करता येणार नाही किंवा या दरम्यान मला काही चांगली ऑफर आली तर मी ते स्वीकारेन अशी शक्यता आहे. कारण तो वेळ मला माझ्या बाळाला द्यायचा आहे. त्यामुळे बाळ होईपर्यंत मी इतकंच सांगू शकते.”
दरम्यान, एकाच मालिकेत काम करत असताना दीपिका व शोएब एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर २०१८मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर पाच वर्षांनी दीपिका व शोएब आई-बाबा होणार आहेत.