टीव्हीवरील लोकप्रिय जोडपं अमन वर्मा व वंदना लालवानी यांचा ९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट होत असल्याची बातमी समोर आली आहे. याचदरम्यान सात वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्न करणारे व सातत्याने चर्चेत राहणारे दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम विभक्त होणार असल्याचं म्हटलं जातयं. दीपिका व शोएब यांनीच आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
दीपिका व शोएब बरेचदा त्यांच्या आंतरधर्मीय लग्नामुळे ट्रोल होत असतात आणि ते दोघेही वेळोवेळी ट्रोलर्सना उत्तर देत असतात. आताही घटस्फोटाच्या चर्चांवर ते दोघे बोलले आहेत. “खरं तर मी अशा बातम्यांवर प्रतिक्रिया देणार नाही, पण लोक याबद्दल बऱ्याच पोस्ट करत आहेत, ब्रेकिंग न्यूज म्हणत आहेत, त्यामुळे मी म्हणेन की दीपिकाने माझी फसवणूक केली आहे,” असं शोएब म्हणाला.
शोएब व्लॉगमध्ये दीपिकाला चिडवतो आणि म्हणतो, “तू मला सांगितलं नाहीस की तू घटस्फोट घेणार आहेस?” शोएबने ही गोष्ट सगळ्या कुटुंबाला सांगितली. समोर ठेवली. ‘बघा काय लिहिलंय..टीव्हीवरील आणखी एका जोडप्याचा घटस्फोट.’ नंतर शोएब दीपिकाला म्हणाला, “तू मला सांगितलं नाही की इंडस्ट्रीमध्ये अजून एक लग्न मोडतंय आणि ते आपणच आहोत.” यावर दीपिका म्हणाली, “मी हे सगळं लपून करते, तुला का सांगू.” यानंतर ते घरच्यांना या बातम्यांबद्दल सांगतात आणि सगळे हसू लागतात.
दीपिकाने माझी फसवणूक केली – शोएब
“मी असं बोलत नाही पण सगळीकडे याच गोष्टी सुरू आहेत तर मी का नको बोलू,” असं म्हणत शोएब हसू लागला. “मी आता व्हिडीओचे असेच थंबनेल बनवणार आणि दीपिकाने माझी फसवणूक केली, ती मला सोडून दूर जातेय,” असं या बातम्यांची खिल्ली उडवत शोएबने म्हटलंय.
यानंतर शोएब दीपिकाला म्हणतो, “दीपिका सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे हा महिना एकत्र राहू, या पवित्र महिन्यात वेगळं नको व्हायला.” हे ऐकताच दीपिका हसू लागते. दोघांनी या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. काहीही बातम्या छापू नका, असं शोएबने घटस्फोटाच्या चर्चा फेटाळत म्हटलं.
‘ससुराल सिमर का’ मालिकेत काम करताना पडलेले प्रेमात
शोएब व दीपिकाची प्रेमकहाणी ‘ससुराल सिमर का’च्या सेटवर सुरू झाली होती. इथेच ते पहिल्यांदा भेटले आणि प्रेमात पडले. काही वर्षे डेट केल्यावर त्यांनी २०१८ साली भोपाळमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले. हे दोघे २०२३ मध्ये एका मुलाचे आई-वडील झाले. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, त्यांच्या व्लॉगमधून ते चाहत्यांशी कनेक्टेड राहतात.