सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असणारी अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. मागच्या बऱ्याच काळापासून दीपिका गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत होत्या. त्यानंतर आता शोएबने दीपिकाच्या प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर या दोघांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर बरेचदा दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. तसेच मागच्या काही दिवसांपासून दीपिका प्रेग्नंट असल्याचं बोललं जात होतं. अशात आता दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत लवकरच ते आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली.
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना शोएबने लिहिलं, “कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि भरलेल्या अंत:करणाने ही बातमी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करत आहे, आमच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर काळ आहे… होय, आम्ही आमच्या पहिल्या मुलाचे आई-बाबा होणार आहोत! लवकरच आम्ही पालकत्त्वाची जबाबदारी स्वीकारणार आहोत. आमच्या बाळासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि खूप साऱ्या प्रेमाची गरज आहे.”
दरम्यान दीपिका आणि शोएब ‘ससुराल सिमर का’ या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी दीपिका आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती रौनक सॅमसन यांच्यात बरेच वाद सुरू होते. त्यानंतर काही वर्षांतच दीपिकाने रौनकपासून घटस्फोट घेतला. मालिकेच्या सेटवर सुरू झालेली दीपिका शोएबची मैत्री पुढे प्रेमात बदलली. सुरुवातीच्या काळात या दोघांनीही त्यांचं नात सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. २०१८ मध्ये दीपिका आणि शोएब यांनी निकाह केला.