फेब्रुवारी महिन्यामध्ये झी मराठीवर ‘यशोदा: गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका सुरू झाली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून दुपारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेला काही दिवसांतच संध्याकाळचा टाइम स्लॉट मिळाला. परंतु सहा महिन्यांतच ही मालिका बंद होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच या मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस पार पडला. त्यावेळी काढलेला एक ग्रुप फोटो शेअर करत या मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावरून आता याबद्दल नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता विरेंद्र प्रधान यांनी एक पोस्ट लिहित त्यांचं मत मांडलं.

आणखी वाचा : ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता दिसते ‘अशी’, तेजश्रीबरोबरचा फोटो पोस्ट करत मालिकेचे दिग्दर्शक म्हणाले…

फेसबुकवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “यशोदा: गोष्ट श्यामच्या आईची.. शेवटचा भाग १९ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजता, झी मराठीवर. टीआरपी नाही हे कारण नक्कीच आहे, मालिका वेळेआधी संपवण्यामागे. उंच माझा झोका , स्वामिनी, यशोदा या गोष्टी मला पूर्ण करता आल्या नाहीत. टीआरपी नाही हेच कारण होते दरवेळी. लोकमान्य , सावित्री ज्योती आणि अशा अनेक मालिका या कारणास्तव लवकर संपल्या . टीआरपी मिळवण्यासाठी आम्हाला ही बऱ्याचदा अशा गोष्टी लिहाव्या लागतात, ज्या बऱ्याचदा आम्हाला लेखक म्हणून पटत नाहीत . वाहिन्या ही अशा गोष्टी आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. म्हणून मी , ही मालिका बंद होतेय हा कांगावा करणार नाही.

पुढे ते म्हणाले, “आपल्या महाराष्ट्रात काय उत्तम साहित्य नाही ? आहे . दर्दी वाहिन्या नाहीत ? आहेत . आपले भारतीय शास्त्रीय संगीत , नाट्य संगीत , भावगीते , कविता , आपले पेहराव , ऋचा परवचा , संध्याकाळ ची शुभंकरोती , दिवाळी पहाट , किर्तन , लेझिम , टाळ मृदुंग , भूपाळी , काकड आरती , पदस्पर्श नमस्कार , खाडिलकर , गडकरी , पुल देशपांडे , बहिणाबाई , संत एकनाथ , साने गुरुजी , नामदेव ढसाळ, सुर्वे , शिरवाडकर ,लक्ष्मण गायकवाड ,विश्वास पाटील , शिवाजी सावंत , प्रकाश नारायण संत .. हजारो लाखो गोष्टी आहेत , ज्या आपल्या मुलांसमोर यायला हव्यात. महाराष्ट्रात आपल्याच या ठेवी दुर्मिळ आणि मलूल होत चालल्या आहेत . आणि काही वर्षात त्या नामशेष होणार , असा आपला प्रवास सुरु आहे . त्यातल्या त्यात आपापल्या कुवती नुसार , काही लोक हे टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत पण त्यांची शक्ती कमी पडतेय. हे कुणा एका दुग्ग्याच काम नाही . समाज ( टीआरपी ) सोबत लागतो . राज्यकर्ते इकडे फारसे लक्ष देणार नाहीत . त्यांची टेन्शन्स वेगळी आहेत . आणि का आपण कुणावर अवलंबून रहावं ? अगदी तो राजा असला तरी , का आपण एकाच व्यवस्थेच्या माथी हा वरवंटा फोडावा ? ही व्यवस्था कोण आणि का बनवतं ? आपण . अशा मालिका ही आपण बंद करतो आणि अशी सिस्टीम (व्यवस्था) ही आपण निवडून देतो . किती घरात अजून लोक साने गुरुजींची पुस्तके वाचतात , आपल्या मुलानं वाचायला देतात ? किती लोक आपले शास्त्रीय संगीत , नाट्य संगीत , भावगीते , बडबडगीते ऐकतात आणि आपल्या मुलांना ऐकवतात?”

हेही वाचा : दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या तेजश्री प्रधानचं शिक्षण किती ते माहीत आहे का? घ्या जाणून…

शेवटी ते म्हणाले, “आम्हा लेखक दिग्दर्शकांना ही चांगले काम करायचे आहे . वाहिन्याना ही उत्तम कंटेंट द्यायचा आहे . पण समोर प्रेक्षक नसेल तर काय करावे ? काही लोक म्हणतील , की आम्ही आहोत तसे दर्दी प्रेक्षक. पण ही संख्या पुरेशी नाही. ती असती तर वाहिन्या अशा मालिका बंद न करत्या. जे खपतं तेच विकतं. काळासोबत जावे असे म्हटले तर जगात अजून असे अनेक देश आहेत , ज्यांनी आपली संस्कृती सोडली नाही, अभिमानाने जगतायत आणि उत्तम जगतायत. आपल्याकडे कलेची कदर नाही , ही खंत बोलून , किंचित वाईट वाटून , एकमेकाना वाईट साईट ठरवून , दोषारोप करून डफलीवर थाप मारून गाणारे शाहीर आजूबाजूला खुप दिसतील . परंतु आपण अशा ठिकाणी टाळ्या देण्या पेक्षा , आपल्याच घरातून संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केला , तर कदाचित उद्या छान चित्र तयार होईल. ही इतर कोणाची ही जबाबदारी नाही. लेखक , प्रेक्षक आणि व्यावसायिक म्हणून आपली जबाबदारी आहे . हे माझे व्यक्तिगत मत आहे . अजूनही चांगले आणि परिणामकारक विचार तुमचे असू शकतील. आपण व्यक्त व्हायला पाहीजे. साने गुरुजींची श्यामची आई ही गोष्ट पूर्ण व्हावी ही माझी तीव्र ईच्छा आज ना उद्या पूर्ण होईल अशी आशा बाळगतो . या प्रवासात मला साथ करणारी झी मराठी , माझे संपूर्ण युनिट , आणि अत्यंत कमी पण दर्दी प्रेक्षक यांचा मी शतश: आभारी आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director virendra pradhan shared a post on social media about his views of trp and his serials rnv
Show comments