Manasi Salvi : “दिस चार झाले मन, पाखरू होऊन…”, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आईशप्पथ’ चित्रपटातील हे गाणं साधना सरगम यांनी गायलं आहे. या गाण्याचा उल्लेख जरी केला तरी डोळ्यासमोर मानसी साळवीचं नाव येतं. मराठी व हिंदी मालिकांमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मानसी साळवीला ओळखलं जातं.

टेलिव्हिनजवर गाजलेल्या ‘असंभव’ मालिकेत सुद्धा तिने काम केलं होतं. मात्र, तिने ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे. ‘असंभव’ मालिका टेलिव्हिजनवर प्रचंड गाजली होती. या मालिकेत उमेश कामत आणि मानसी साळवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, मानसीने मालिका सोडल्यावर पुढे या मालिकेत उर्मिला कानेटकरची एन्ट्री झाली होती.

मानसी ‘असंभव’ मालिकेतून ब्रेक घेण्याविषयी म्हणाली, “असंभव’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान मी गरोदर होते. ती मालिका अतिशय गूढ होती. काळी जादू, टोचलेल्या बाहुल्या असं कथानक होतं. मग मला असं वाटलं प्रेग्नन्सीमध्ये हे सगळं नाही पाहायचंय. त्यात मी साकारणाऱ्या भूमिकेसाठी बऱ्याचदा घाबरण्याचा अभिनय करायचा होता. हे सगळं गरोदरपणात माझ्या बाळासाठी मलाच योग्य वाटत नव्हतं.”

“मला तेव्हा पल्लवी जोशी म्हणाली होती की, आपण शुभ्रा या भूमिकेला गरोदर दाखवूया वगैरे… पण, मी तिला बोलले आता थांबलं पाहिजे. कारण, मी बरीच वर्षे काम करत होती. मला तेव्हा माझं मातृत्व व्यवस्थित अनुभवायचं होतं. मला पुस्तकं वाचायची होती, सहस्त्रनाम, सुक्तम वगैरे रोज बोलायचं होतं. त्यामुळेच मी मालिका सोडली.” असं मानसीने सांगितलं.

manasi salvi
मानसी साळवी

लेकीचा जन्म झाल्यावर मानसीने काही वर्षांनी पुन्हा एकदा हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. यानंतर २०२० मध्ये ‘झी मराठी’वरील ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १३ वर्षानंतर मानसी मराठी मालिकाविश्वात परतली. सध्या ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. आजही मानसीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली २९ वर्षे ही अभिनेत्री रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. भविष्यात चांगल्या मराठी प्रोजेक्टमध्ये काम करण्याची इच्छा आहे असंही मानसीने यावेळी सांगितलं.

Story img Loader