Lakshmi Niwas Fame Divya Pugaonkar : २०२४ च्या वर्षाखेरीस अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. रेश्मा शिंदे, शाल्व किंजवडेकर, किरण गायकवाड-वैष्णवी, निखिल राजेशिर्के असे बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. आता या पाठोपाठ मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्या पुगावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
दिव्या पुगावकरने इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नपत्रिकेची लहानशी झलक शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत दिव्याने ती लवकरच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दिव्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर ‘अक्षय आणि दिव्या Save The Date’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. पण, अभिनेत्रीने यामध्ये कुठेही ती किती तारखेला लग्नबंधनात अडकणार याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे कमेंट्समध्ये काही कलाकारांसह नेटकऱ्यांनी सुद्धा ‘तारीख सांग’ अशी विचारणा दिव्याकडे केली आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरीडच्या ‘तारीख सांग’ या कमेंटवर, दिव्याने ‘कॉलवर सांगते’ असा रिप्लाय दिला आहे.
दिव्याचा होणारा नवरा काय करतो?
दिव्याच्या ( Divya Pugaonkar ) होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. या दोघांचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. यानंतर अनेकदा अभिनेत्रीकडे ती लग्नबंधनात केव्हा अडकणार याबद्दल विचारणा केली जायची. यावर दिव्याने, “लवकरच लग्नाबद्दल खुलासा करेन” असं सांगितलं होतं. अखेर नव्या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्रीने लवकरच लग्न करणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना पत्रिकेची झलक शेअर करत दिली आहे.
दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे.
हेही वाचा : Bharat Jadhav : भरत जाधवचा नाटकात फसलेला विनोद कुठला? त्यानेच सांगितलेला अफलातून किस्सा काय?
दरम्यान, दिव्या पुगावकर ( Divya Pugaonkar ) सध्या ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची म्हणजेच जान्हवीची व्यक्तिरेखा अभिनेत्री दिव्या पुगावकर साकारत आहे.