भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र उलगडून दाखवणारी मालिका काही वर्षांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. स्टार प्रवाह या वाहिनीवीर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ (Dr. Babasaheb Ambedkar Serial) या नावाने ही मालिका सुरू झाली होती. मे २०१९ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. पण त्याआधी आजच्याच दिवशी म्हणजेच २० मार्च २०१९ रोजी या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती आणि या घटनेला आज सहा वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त मालिकेच्या निर्मिती संस्थेने खास पोस्ट शेअर केली आहे.
‘दशमी क्रिएशन’ या निर्मिती संस्थेने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेची निर्मिती केली असून आजच्या चित्रीकरणाच्या दिवसाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत आणि यानिमित्त निर्मिती संस्थेने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह त्यांनी “आजच्या दिवशी २०१९ या वर्षी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनगाथेवर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती” असं म्हटलं आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने (Shivani Rangole) रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली होती. त्यामुळे शिवानीदेखील ही पोस्ट शेअर केली आहे. शिवाय या पोस्टच्या कमेंट्समध्ये तिने “या भूमिकेबद्दल नेहमीच कृतज्ञ आहे” असं म्हटलं आहे. शिवानी रांगोळेबरोबर मालिकेत सागर देशमुख या अभिनेत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती. या मालिकेला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला होता.
दरम्यान, शिवानीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नी रमाई यांची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. या भूमिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. अनेकजण तिचे चाहते झाले. यानंतर तिने अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.