मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वानंदी-आशिष, मुग्धा-प्रथमेश, पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण या लोकप्रिय जोडप्यानंतर आता अभिनेत्री सुकन्या काळणचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. ‘एकापेक्षा एक’ या सचिन पिळगावकरांच्या रिअॅलिटी शोमधून सुकन्या घराघरांत लोकप्रिय झाली. रिअॅलिटी शो केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्राकडे आपलं पाऊल वळवत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
सुकन्या काळणच्या साखरपुड्याला अभिनेता कुशल बद्रिकेने पत्नी सुनैनासह हजेरी लावली होती. सुनैनाने सुकन्याच्या साखरपुड्यातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय अभिनेत्रीने शेअर केलेल्या साखरपुड्यांच्या फोटोंवर सगळ्यांनी ‘कन्याहुईरोशन’ हा विशेष हॅशटॅग वापरल्याचं पाहायला मिळत आहे.
सुकन्या व रोशन गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र होते. साखरपुड्याला अभिनेत्रीने लाल रंगाची शिमरी साडी, तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने शेरवानी परिधान केली होती. या आनंदाच्या क्षणी अभिनेत्रीने गुडघ्यावर बसून रोशनला अंगठी घातली आणि त्यानंतर दोघांनीही कपल डान्स केल्याचं सुकन्याने शेअर केलेल्या व्हिडीओ व फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
![kushal](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/12/image-57.png?w=565)
दरम्यान, सुकन्या-रोशन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकात सुकन्यासह वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, निमिष कुलकर्णी आणि विकास चव्हाण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.