अनेक टीव्ही कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्या कलाकारांनी मालिकांमध्ये काम करणं बंद केलं. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे राधिका मदान होय. राधिका नुकतीच तब्बू आणि अर्जुन कपूर यांच्या ‘कुत्ते’ चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने टीव्ही मालिकांमध्ये काम करतानाचा तिचा अनुभव सांगितला होता. यावरून तिच्यावर टीव्ही कलाकारांकडून टीका होत आहे. अशातच टीव्ही क्वीन एकता कपूरनेही राधिकाला फटकारलं आहे.
राधिकाने टीव्ही इंडस्ट्रीबद्दल म्हणाली होती, “मी ४८ ते ५६ तास सतत काम केलं आहे. स्क्रिप्टबद्दल विचारल्यावर ते म्हणायचे, तुम्ही सेटवर जा, गरमागरम स्क्रिप्ट येत आहे. रात्री एपिसोड टेलिकास्ट करायचा आहे, त्यामुळे लवकर शूटिंग करण्याची घाई असायची. आमचे डायरेक्टर्स दर महिन्याला बदलत असायचे. जो फ्री असेल तो दिग्दर्शक येणार. मला आठवतंय की एक दिग्दर्शक तिथे होते आणि मी त्यांना फक्त माझ्या पात्राबद्दल विचारत होते की माझं पात्र असं नाही, कारण हे सर्व त्याच्या बालपणात घडलं आहे. तो दिग्दर्शक इकडे तिकडे करत होता. मी बोलल्यामुळे तो नाराज झाला आणि नंतर म्हणाला की राधिका, जेव्हा आपण चित्रपट करू तेव्हा आपण एका सीनवर तीन दिवस चर्चा करू. आपल्याला रात्री एपिसोड टेलिकास्ट करायचा आहे. त्यामुळे आता चर्चा नको. त्यामुळे चित्रपट केल्यावर एका सीनवर चर्चा करण्यासाठी आपल्याला तीन दिवस मिळतील, ही गोष्ट माझ्या मनात बसली. जेव्हा मी ‘मर्द’ चित्रपट साइन केला, तेव्हा ४ महिन्यांनी शूट सुरू होणार होतं आणि माझ्या हातात स्क्रिप्ट होती. त्याचं काय करावं हेच मला कळत नाही. कारण ते सर्व माझ्यासाठी खूप लक्झरी होतं,” असं राधिकाने सांगितलं होतं.
राधिकाच्या या मुलाखतीनंतर अभिनेत्री सायंतनी घोषने संताप व्यक्त केला होता. “राधिकाच्या बोलण्याने मी दुखावली गेली आहे. टीव्हीमुळेच अनेक महिलांना रोजगार मिळत आहे. तसेच चित्रपटातील बडे स्टार्सही टीव्हीवरून आपल्या करिअरला सुरुवात करतात. या प्लॅटफॉर्मवर येऊन ते त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करतात आणि राधिका असं बोलत आहे. तिच्याशिवाय इतरही अनेक जण आहेत, जे टीव्हीला कमी लेखतात. पण असं करू नये,” असं सायंतनी म्हणाली होती.
सायंतनीच्या या उत्तराचं एकता कपूरने कौतुक केलंय आणि राधिकावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. “दुःखद आणि लज्जास्पद. कलाकारांना त्यांच्या मुळांबद्दल आदर नाही. शाब्बास सायंतानी घोष,” असं एकता कपूरने म्हटलंय.