Ramadan 2025: बॉलीवूडप्रमाणेच टीव्ही इंडस्ट्रीतही अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी आंतरधर्मीय लग्नं केली आहेत. एक जोडीदार हिंदू तर एक मुस्लीम असे अनेक कलाकार आहेत. हे एकमेकांचे सण साजरे करतात आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतात. असंच एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजे सचिन त्यागी व रक्षंदा खान होय.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. राजन शाहीच्या या शोमध्ये चार पिढ्यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. अभिनेता सचिन त्यागी गेल्या अनेक वर्षांपासून या शोमध्ये दिसत आहे. सचिनने आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. सचिनने तो रमजानमध्ये रोजे ठेवतो अशी माहिती दिली.

सचिन त्यागीची पत्नी मुस्लीम आहे. सचिनने अभिनेत्री रक्षंदा खानशी लग्न केलं आहे. रक्षंदा रमजानमध्ये रोजे ठेवते, त्यामुळे तिच्याबरोबर सचिनही रोजे ठेवतो. सचिन रमजानबद्दल काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.

रोजे ठेवतो सचिन

टेली मसालाशी बोलताना सचिन म्हणाला, “मला खूप आश्चर्य वाटायचं आणि माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची आठवण आहे. कारण माझा विश्वासच बसत नव्हता की कोणीतरी ३० दिवस असं कसं करू शकतं. आता तर हे माझ्या घरातच होतं. आता ती खात नाही, त्यामुळे कधी कधी मलाही खावं वाटत नाही. काही वेळा तर मीही रोजे ठेवतो. तुम्हाला जे मनापासून करावं वाटतं ते करा. तुम्ही जे काही करायला सुरुवात कराल आणि ते मनापासून कराल ते सर्व प्रेम आणि विश्वासाने सगळं शक्य होतं.”

सचिन पुढे म्हणाला, “रोजा ठेवल्यावर १२-१३ तास ​​पाण्याविना काढावे लागतात. हे खूप कठीण आहे. पण जेव्हा विश्वास असतो ना लोक डोंगर फोडून रस्तेही बांधतात. त्यामुळे पाण्याविना दिवस काढणं सहज शक्य आहे. जेव्हा मी रक्षंदाला भेटलो होतो तेव्हा मला इस्लाम म्हणजे काय हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी हदीस वाचली. त्यात तीन हजार मुद्दे होते, त्यापैकी मी १२००-१३०० वाचण्याचा प्रयत्न केला आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता मला इतरांबद्दल माहिती नाही पण मला असं वाटतं की प्रत्येकजण आपापल्या पद्धती शोधत आहेत. सगळे एकच गोष्ट बोलत आहेत, मला काहीच वेगळं वाटलं नाही, सगळं सारखंच वाटलं.”