लोकप्रिय टीव्ही अभिनेता संदीप बसवाना आता ‘अपोलीना’ मालिकेत दिसत आहे. दोन दशकांहून जास्त काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या संदीपने एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, पण तो चित्रपट फ्लॉप झाला. एका मुलाखतीत त्याने टीव्हीवर पुनरागमन करण्याबाबत प्रतिक्रिया दिली. ४७ वर्षीय संदीप मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सांवतबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय. मागील २२ वर्षांपासून ते एकत्र आहेत. त्याने या मुलाखतीत अश्लेषाबरोबरच्या नात्यावरही भाष्य केलं.

“मी वर्तमानात जगतो. मी आत्ता लग्न करत नाहीये, पण लग्न करो वा नाही, मी कायम माझ्या जोडीदारासोबत असतो. कदाचित भविष्यात माझे लग्नही होईल. खरं तर इथे आपण पेपर वर्कला खूप महत्त्व देतो. मी कदाचित या कारणांसाठी लग्न करेनही, पण यासाठी करणार नाही की मला १० लोकांना सांगायचंय की ही माझी पत्नी आहे. जर मी अध्यात्माकडे जात असेल पण त्यात ती नसेल तर मग त्याला अर्थ नाही. बरेच लोक म्हणतात तू मुंबईत का आला होतास. मी स्पष्ट सांगतो की मी मजा करायला आलो होतो. मला पार्टी करायची होती आणि सुंदर मुलींच्या आजूबाजूला राहायचं होतं. मला जगायचं होतं. ते हरियाणात शक्य नव्हतं म्हणून मी मुंबईत आलो. मला इथे खूप मजा आली. मग त्याचाही कंटाळा आला आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात अध्यात्म आले. आता अध्यात्मामुळे मी आयुष्यात पळवाट शोधत नाही,” असं संदीप म्हणाला.

हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

२२ वर्षांपासून एकत्र आहेत संदीप-अश्लेषा

“माझी आणि अश्लेषा सावंतची भेट ‘कमल’ या शोमध्ये झाली होती. त्यावेळी ती १८ वर्षांची होती आणि माझे वय २४ वर्षे होते. मला आज हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे किंवा नंतर मुलं हवी आहेत असं आमचं नव्हतं. ती माझ्याकडे बघून म्हणायची की तू तुला जे करायचं आहे ते कर, मी तुझ्यासोबत आहे. मला फक्त तुझी सोबत हवी आहे. जवळपास २२ वर्षे झाली आम्ही एकत्र आहोत. आम्ही आयुष्यात जे पाहिलं ते सगलं एकत्रच पाहिलंय. पूर्वी अश्लेषाला ध्यानात रस नव्हता. मी २०१० मध्ये पहिल्यांदा ध्यानासाठी गेलो. त्यानंतर मी २०१४-१५ मध्ये अश्लेषाला धर्मशाळेतील ओशो आश्रमात घेऊन गेलो. ते तिला खूप आवडलं. मला आता मरण आलं तरीही काहीच फरक पडत नाही, पण प्रेम मात्र असायला हवं, अशा विचारांची ती आहे,” असं संदीप बसवानाने सांगितलं.

हेही वाचा – ९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

चित्रपट फ्लॉप झाल्याने टीव्हीवर परतलो – संदीप

“मी लेखन-दिग्दर्शनातही हात आजमावला. माझा हरियाणा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, पण त्याने व्यावसायिकदृष्ट्या फारशी कमाई केली नाही. बरेच जण म्हणालेले की स्टार्सना चित्रपटात घे, कारण त्यांच्याशिवाय चित्रपट चालत नाही. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. आता मी पुन्हा टेलिव्हिजनमध्ये पैसे कमावेन आणि पुन्हा नवीन कथा लिहेन. कथा लिहिणं सुरू आहे. मी पुन्हा टीव्हीवर काम करतोय, कारण मला पैसे कमवायचे आहे. खरं सांगायचं तर टीव्हीमध्येच पैसा आहे. ओटीटीवरही फक्त स्टार्सनाच पैसे चांगले मिळतात. सहायक भूमिका करणाऱ्यांना फार पैसे मिळत नाही. आम्हाला दिवसाचे पैसे मिळतात. आता माझा चित्रपट फ्लॉप झाला आहे, मी पैसे कमावण्यासाठी पुन्हा टीव्हीवर करेन. पण केवळ पैशांसाठी मी कोणतेही पात्र करणार नाही,” असं संदीप बसवाना म्हणाला.

Story img Loader