दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम हे टीव्हीवरील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. या दोघांनी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता अशी शोएब इब्राहिमची ओळख आहे. तर दीपिकानेही अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत, सध्या ती तिच्या मुलामुळे मालिकांपासून दूर आहे. हे दोघे व्लॉगही शेअर करत असतात. त्यांच्या एका व्लॉगमध्ये त्यांनी चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली. त्यासाठी चाहते शोएब व दीपिकाचं कौतुक करत आहेत.

अभिनेत्री दीपिका कक्कर मागील काही दिवसांपासून एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत होती. दीपिकाने कामाचं मानधन दिलं नाही आणि नोकरीतून काढून टाकलं असा आरोप तिने केला होता. याचदरम्यान आता शोएब इब्राहिमने त्याच्या एका व्लॉगमध्ये आनंदाची बातमी दिली आहे. त्याने दीपिकाच्या आईसाठी एक फ्लॅट खरेदी केला आहे.

शोएब इब्राहिमने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितलं की, दीपिकाची आई २०१४ पासून ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती, तोच फ्लॅट त्याने विकत घेतला आहे. मालक तो फ्लॅट विकत होता, सुरुवातीला तेवढे पैसे जमवण्यात अडचण आली, पण तरीही त्याने तो फ्लॅट सासूबाईसाठी घेतला. त्याने घराची नोंदणी केली आहे. आता दीपिकाची आई ते घरं हवं तसं सजवू शकते आणि रिनोव्हेशनही करू शकते, असं शोएब म्हणाला.

दीपिकाने व्हिडीओमध्ये सांगितलं की ती, तिचे सासू आणि सासरे, नणंद सबा आणि तिची आई हे सर्वजण मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील एकाच इमारतीत राहत आहेत. ते सगळे आता तिथे स्थिरावले आहेत, त्यामुळे तो परिसर सोडून त्यांना कुठेही जायचं नाही. इथून दुसरीकडे जायचा कधीच विचार करणार नसल्याचं तिने सांगितलं. दीपिकाने पती शोएबबद्दल अभिमान व्यक्त केला. “माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे तू आधी तुझ्या आईसाठी घर घेतलंस आणि आता तुझ्या सासूसाठी घर घेतलंस,” असं दीपिका म्हणाली.

शोएबच्या सासू झाल्या भावुक

शोएब इब्राहिमने घराची कागदपत्रे दिल्यानंतर सासूबाई भावुक झाल्या. त्यांनी जावई शोएबला मिठी मारली आणि त्या रडू लागल्या. “सर्वांचे आभार. यापेक्षा मोठं माझ्यासाठी काहीच नाही. या कुटुंबात आल्यावर मला इतकं प्रेम मिळालं आहे की मी सांगू शकत नाही,” असं दीपिकाच्या आईने म्हटलं. दीपिका व शोएबने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. दीपिकाचे आई-वडील घटस्फोटित असून वेगळे राहतात.

Story img Loader