इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडपी आहेत जी लग्न न करता एकत्र लिव्ह इनमध्ये राहत आहेत आणि आनंदी आहेत. संदीप बसवाना व मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंत गेली २२ वर्षे लग्न न करता एकत्र आहेत. असंच आणखी एक जोडपं म्हणजे कोरिओग्राफर, अभिनेता सनम जोहर व त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री ॲबिगेल पांडे (Sanam Johar Abigail Pande live in relationship) होय. ३५ वर्षांचा सनम सध्या ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम करत आहे. तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये किती आनंदी आहे याबाबत त्याने सांगितलं.

सनम म्हणाला, “आम्ही एक दशकाहून जास्त काळापासून एकत्र आहोत आणि मला आता कायदेशीर औपचारिकता करण्याची गरज वाटत नाही. आम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट आहोत आणि लग्नामुळे काहीही बदलणार नाही.”

आपल्या आजूबाजूला लग्न झालेली अनेक जोडपी आहेत आणि ती अजिबात खूश नाहीत, असं सनमने सांगितलं. सनम म्हणाला, “मला माझ्या आजूबाजूला अनेक जोडपी दिसतात जी एकत्र आनंदी नाही. लोकांमध्ये आता फार संयम राहिलेला नाही. त्यामुळे मला वाटतं की आम्ही एकत्र खूप आनंदी आहोत, त्यामुळे लग्नामुळे काहीही बदलेल, असं नाही.”

सनम पुढे म्हणाला, “मला मोठी आणि खर्चिक लग्न आवडत नाहीत. मला वाटतं की आपण लग्न आणि भव्य समारंभांवर खूप पैसे खर्च करत आहोत. लग्न कसं करावं, याबद्दल प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन आहे पण हे माझे वैयक्तिक मत आहे. माझी आई आणि ॲबिगेलच्या आई-वडिलांनी आमचा लग्न न करण्याचा निर्णय स्वीकारला आहे, त्यामुळे समाजाने आमच्यावर लग्नासाठी कोणताही दबाव टाकू नये, असं मला वाटतं.”

सनम त्याची पार्टनर ३३ वर्षीय अ‍ॅबिगेलबद्दल म्हणाला, “ॲबिगेलने मला माझ्या करिअरमध्ये खूप पाठिंबा दिला आणि मला प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला जेव्हा मी ऑडिशनला जायचो आणि सिलेक्ट व्हायचो नाही तेव्हा ती गोष्ट सामान्य आहे, असं मला ती सांगायची. ॲबिगेलने अनेक टीव्ही शो केले आहेत. मला वाटतं की अनेक वर्षांनी मला किसीके प्यार में मध्ये संधी मिळाली आहे. मला आशा आहे की लोक मला या भूमिकेत पसंत करतील.”

डान्सपासून का दुरावला सनम?

“कोरिओग्राफी हा सोपा बिझनेस नाही, कोणी किती काळ नाचू शकेल? मी कोरिओग्राफी सोडत नाहीये, पण गेल्या काही वर्षांत मला जाणवलं की मी यापासून दूर जावं लागेल, जेणेकरून लोक मला अभिनयासाठी संधी देण्याचा विचार करू शकतील. कारण जेव्हा मी अभिनयाच्या प्रोजेक्टसाठी लोकांना भेटायला जायचो, तेव्हा ते मला अभिनेता नाही तर रिअॅलिटी शोमधील डान्सर समजायचे,” असं सनम यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला होता.

Story img Loader