‘कबूल है’ फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री गुरप्रीत बेदी आई होणार आहे. गुरप्रीत व तिचा पती अभिनेता कपिल आर्य लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. गुरप्रीत व कपिलने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. हे जोडपं आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खूप खूश आहे.
गुरप्रीत बेदी आणि कपिल आर्य यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर घोषणा केली की ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. गुरप्रीतने इ-टाइम्सशी बोलताना तिच्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही २०२१ मध्ये करोनाच्या साथीत लग्न केलं होतं. तेव्हाही आम्ही लग्नाची नीट प्लॅनिंग करू शकलो नव्हतो. पण आमच्या लग्नाचा सोहळा खूप छान झाला होता आणि सर्वांनी लग्नात खूप छान वेळ घालवला होता. त्याचप्रमाणे, आता आम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत नव्हतो, पण नियतीच्या मनात हे होतं. माझ्यासाठी आणि कपिलसाठी हीच योग्य वेळ आहे हे देवाला माहीत होतं. त्यामुळे आम्ही बाळाचे स्वागत करण्यास तयार आहोत,” असं गुरप्रीत म्हणाली.
गुरप्रीत शेवटची ‘श्रीमद रामायण’मध्ये झळकली होती. ती तिच्या कामाबद्दल म्हणाली, “माझ्याकडे गेल्या वर्षी काही चांगल्या ऑफर आल्या होत्या, पण माझ्या प्रेग्नेंसीमुळे मी त्या नाकारल्या. कामाला नकार देणं थोडं अवघड होतं, पण मला ते करावं लागलं. मी माझ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहे आणि मी कामासाठी पूर्णपणे तयार असेन तेव्हाच परत येईन.”
गुरप्रीतची प्रसूती पुढील महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात होणार आहे. “मी गरोदर आहे, असं ज्या दिवशी आम्हाला समजलं, तेव्हा आम्ही दोघे काही कामासाठी बाहेर गेलो होतो. मला खूप आनंद झाला होता, पण मला खूप विचित्र प्रकारचे विचार येत होते. मग जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो तेव्हा आम्हाला ही आनंदाची बातमी मिळाली. तेव्हापासून आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत. काही दिवस कठीण असतात पण तेही चांगले आहेत. कपिल माझी खूप काळजी घेतोय आणि मला सांभाळून घेतोय,” असं गुरप्रीतने सांगितलं.
गुरप्रीतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘परमावतार श्री कृष्णा’, ‘काठमांडू कनेक्शन’, ‘कबूल है’, ‘रक्तांचल’, ‘दिल ही तो है’, ‘लौट आओ त्रिशा’, ‘प्यार के सात वचन धर्मपत्नी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.