Shobitha Shivanna Death: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री शोभिता शिवन्नाचा मृतदेह तिच्या घरात आढळला आहे. तिच्या निधनाची बातमी येताच खळबळ उडाली आहे. शोभिताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
शोभिता शिवन्नाने आत्महत्या केली आहे. ती ‘ब्रह्मगंटू’ आणि ‘निन्निंदले’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिकांसाठी ओळखली जायची. शोभिता हैदराबादमधील गचिबावली येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. ती पती सुधीरसोबत श्रीराम नगर कॉलनी येथील घरी राहायची, इथेच तिने आत्महत्या केली.
हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शोभिता ही मूळची कर्नाटकातील सकलेशपूरची आहे. गेल्या वर्षी तिने लग्न केलं आणि अभिनयापासून ती दूर गेली. तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कन्नड अभिनयविश्व आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोभिताच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
शोभिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवण्यात आला. तिचे पार्थिव बेंगळुरूला नेण्याची व्यवस्था केली जात आहे, तिथेच तिचे अंतिम संस्कार केले जातील. दरम्यान, शोभिताच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.