‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला शिवकुमार अर्थात अभिनेता ऋषी सक्सेना लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये ऋषीची जबरदस्त एन्ट्री होणार आहे. मिहीर शर्मा या व्यक्तिरेखेत तो पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात ‘स्टार प्रवाह’ने ऋषीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर त्याच्या चाहत्याने खटकणारी प्रतिक्रिया दिली आहे.
“‘मिहीर शर्मा’ येतोय तुमच्या भेटीला…”, असं कॅप्शन लिहित ऋषी सक्सेनाचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता म्हणतो, “नमस्कार, मी ऋषी सक्सेना. आज मी तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलोय. मी तुम्हाला सर्व प्रेक्षकांना भेटायला येतोय ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत. ९ जूनच्या महाएपिसोडपासून मी हा प्रवास सुरू करतोय. फार इंटरेस्टिंग भूमिका आहे. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल.”
याच व्हिडीओवर एक चाहता म्हणाला, “भाई येतोस तर ये, असं पण आम्ही त्या मालिकेला दुर्लक्षचं करत आलोय. पण हा दुसरा वगैरे नवरा बनून नको येऊ कुणाचा म्हणजे झालं.” चाहत्याच्या या प्रतिक्रियेवर ऋषीने फक्त हसण्याचा इमोजी दिला. त्यानंतर चाहता आणखी एक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तसं नाही रे ब्रो..,गंमत म्हणून बोलतोय. पण सर्व गोष्टी अति प्रमाणात दाखवतायत. घटस्फोट, लफडी, दुसरं लग्न इतकं सामान्य गोष्ट झाली की ते सहजपणे दाखवणं सुरू झालं आणि आपली संस्कृती अशी नाहीये, याच गोष्टी प्रेक्षकांना आवडत नाही बसं. अभिनेता म्हणून तू उत्तम कलाकार आहेसच.”
यावर प्रतिक्रिया देत ऋषी म्हणाला, “नवरा बनून नाही येणार, मग बघशील?” त्यावर चाहता म्हणाला, “हो नक्की. पण या मालिकेऐवजी जर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत तुला बघायला मिळालं असतं ना तर अजून जास्त आवडलं असतं सर्वांना.” चाहत्याच्या या प्रतिक्रियेवर अभिनेता हसत म्हणाला, “स्मार्ट.”
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेत ऋषी म्हणजेच मिहीर शर्मा हा उत्तम शेफ दाखवण्यात येणार आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.