मराठी मालिकाविश्वात सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे तेजश्री प्रधानने अचानक ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका का सोडली? ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून बाहेर पडण्याचा तेजश्रीने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच मालिकेत मुक्ताच्या जागी वेगळा चेहरा पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच तेजश्री, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधानने एक पोस्ट केली आहे; जी सध्या खूप चर्चेत आली आहे. या पोस्टमधून तिने मालिका सोडल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे. त्यामुळे पोस्टवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा – लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”
अभिनेत्री तेजश्री प्रधानने पिवळ्या रंगाच्या साडीतला फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. “चिअर्स…काही वेळेला बाहेर पडणं गरजेचं असतं. तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही,” असं तेजश्रीने लिहिलं आहे. यावर “तू प्रेमाची गोष्ट सोडू नको”, “तू असं का करत आहेस?”, “तुझ्यामुळेच आम्ही ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका पाहत होतो”, “तुझ्याशिवाय ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मज्जा नाही”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत. तसंच काही चाहत्यांनी तेजश्रीच्या निर्णयाचा आदर केला आहे.
एका चाहतीने लिहिलं, “प्लीज ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडू नका. फक्त तुम्हा दोघांसाठी पहिल्या मालिका पाहत होतो. दुसऱ्या कोणाला सागरबरोबर मुक्ता म्हणून पाहू शकत नाही. आम्ही प्रेक्षक जे मनापासून तुमचे काम पाहतो, तुमच्यारवर प्रेम करतो, त्यांचा विचार तुम्ही केला पाहिजे.” तर दुसऱ्या चाहतीने लिहिलं की, आज मी झोपेतून उठल्यावर तू मालिका सोडणार असल्याची बातमी पाहिली आणि सगळा मूड खराब झाला. तिसऱ्या चाहतीने लिहिलं, “खूप वाईट वाटतंय…रोज रात्री ८ वाजता मुक्ता म्हणून तेजश्रीला बघण्याची सवय झाली होती आणि प्रचंड उत्सुकता असायची. असो पण तू नेहमीप्रमाणे या मालिकेत खूपच भारी काम केलंस. तुझा निर्णय योग्यच असेल.”
हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालच्या चुकीमुळे ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
दरम्यान, लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता म्हणून अभिनेत्री स्वरदा ठिगळे झळकणार आहे. स्वरदाने मराठीसह हिंदी मालिकेत काम केलं आहे. ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली आहे.