‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि याचबरोबर या मालिकेची कथा प्रेक्षकांना खूप आवडली. पण गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न येत आहेत. देशमुखांच्या घरात चाललेल्या गोंधळामुळे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिच्या पोस्टवर कमेंट करत प्रेक्षकांनी आता तिला परत येण्याची विनंती केली आहे.
काही दिवसांपूर्वी मधुराणी मालिकेतून ब्रेक घेऊन ऑस्ट्रेलियाला तिच्या एका कार्यक्रमासाठी गेली. ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याने मालिकेच्या कथानकामध्येही बदल करून अरुंधती परदेशात गेली असल्याचं दाखवण्यात आलं. ती परदेशात जाताच देशमुखांच्या घरात एकामागून एक संकटे येऊ लागली. देशमुख यांच्या घरात सुरू असलेला गोंधळ न पाहावल्यामुळे प्रेक्षकांनी थेट मधुराणीलाच परत येण्याचं साकडं घातलं.
मधुराणी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तिच्या ‘कवितेचं पान’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये गेली. या ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती तिची ट्रीप कशी चालू आहे याचे अपडेट्स देत आहे. तर आता नुकताच तिने एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. यामध्ये ती एका हॉटेलमध्ये प्रॉन लाक्सा खाताना दिसत आहे. या तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत तिला लवकर मालिकेत परत येण्याची विनंती केली.
एका नेटकऱ्याने लिहिलं, “अरुंधतीताई लवकर ये इकडे. समृद्धीमध्ये खूप घोळ होत आहेत. तुझी इकडे खूप गरज आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ये बाई लवकर… इकडे देशमुखांच्या घरात नुसता गोंधळ चालू आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “कांचनताई म्हणत असतील, अगं अरुंधती लवकर ये. इकडे सगळ्यांना वेड लागलंय. मला आता हे सांभाळायला जमणार नाही. ठेव ती कोळंबी बाजूला आणि लवकर ये एकदाची.” तर आणखी एकाने लिहिलं, “डिश चांगली आहे पण मधुराणी लवकर मालिकेत ये. तुझी खूप वाट पाहात आहोत. तू नाहीस तर मालिकेत खूप कंटाळवाणा ट्विस्ट सुरू आहे. जितक्या शक्य असेल तितक्या लवकर ये.”