‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. त्याने या कार्यक्रमाला रामराम करत झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ कार्यक्रमात एण्ट्री केली. मात्र हा कार्यक्रमही फार काळ चालला नाही. आता प्रेक्षक त्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पुन्हा येण्याची विनंती करत आहेत.
हाती चित्रपट असल्यामुळे तसेच मध्यंतरी आजारी असल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडला असल्याचं ओंकारने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. पण आता ओंकारला पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
वनिता खरातच्या लग्नाला ओंकार उपस्थित राहू शकला नाही. म्हणूनच त्याने चक्क तिच्या घरी जाऊन खास सरप्राईज दिलं. याचदरम्यानचा व्हिडीओ वनिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी यावर अनेक कमेंट केल्या आहेत. शिवाय वनिताने ओंकारला लग्नाला बोलावलं नसल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. या व्हिडीओमधून सगळ्यांनाच उत्तर मिळालं आहे.
कृपया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पुन्हा परत ये ओंकार, ओंकार आम्ही तुला खूप मिस करतो, वनिता ओंकारला पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये घेऊन ये. काहीच भागांसाठी ओंकारला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये आणलं तरी चालेल अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केल्या आहेत.