चित्रपट किंवा मालिकेत मारामारी जेव्हा पाहायला मिळते, तेव्हा अनेकदा नायकाने गुंडाला मारल्यानंतर तो गुंड खूप दूरवर जाऊन पडताना दिसतो. सामान्यत: असे खऱ्या आयुष्यात होत नाही. मात्र हे कसे होत असेल, असादेखील अनेकदा प्रेक्षकांना प्रश्न पडताना दिसतो. आता अभिनेता नितीश चव्हाणने सोशल मीडियावर अशाच एका सीनच्या शूटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मारामारीचे सीन कसे होतात शूट?

‘लाखात एक आमचा दादा’ व ‘शिवा’ या दोन मालिकांचा महासंगम सध्या पाहायला मिळत आहे. यामध्ये एक मारामारीचा सीन दाखवण्यात आला होता, जिथे गुंड सूर्याला मारत असतात आणि शिवा त्याच्या मदतीला धावून येते. आता या सीनच्या शूटिंगचा व्हिडीओ नितीशने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये क्रेनला बांधलेल्या दोरीच्या साहाय्याने हे सीन शूट केल्याचे पाहायला मिळत आहे. नितीशने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले नेटकरी?

नितीश चव्हाणने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “कडक दादा”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “लागिरं झालं जीच्या अॅक्शन सीनची आठवण झाली दादा”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “कडक आमचा लाडका दादा”, याबरोबरच अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

‘शिवा’ व ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकांविषयी बोलायचे तर दोन्ही मालिकांमध्ये नवीन वळण आल्याचे दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तुळजा व शिवा दोघी मिळून डॅडींच्या घरात आजीच्या जमिनीचे पेपर घेण्यासाठी शिरल्या आहेत. मात्र, तिथे तुळजाच्या हाती वेगळेच कागद लागतात. सूर्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याचे त्यांना समजते.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे शिवा व तिचे कुटुंब तिच्या आजीची जमीन पुन्हा मिळविण्यासाठी साताऱ्यात आले आहे. ही जमीन तुळजाच्या वडिलांनी डॅडींनी बळकावली आहे. जेव्हा डॅडी शिवाच्या आजीचा अपमान करतात, त्यानंतर शिवादेखील भडकल्याचे पाहायला मिळाले होते. तिने त्यांची कॉलर धरलेली पाहायला मिळाली होती. आता ती तुळजाच्या मदतीने कागद शोधताना दिसत आहे.

हेही वाचा: हळद लागली…! रेश्मा शिंदेचा दाक्षिणात्य लूक अन् होणाऱ्या नवऱ्याची पहिली झलक आली समोर, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, आता शिवाला तिच्या आजीच्या जमिनीचे कागद परत मिळवता येणार का, तुळजाला इतके मोठे सत्य समजल्यानंतर ती काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.