‘इंडियन आयडॉल’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. १९ वर्षांपूर्वी या शोचे पहिले पर्व आले होते. या पर्वाच्या फिनालेमध्ये चाहत्यांना अभिजीत सावंत आणि अमित साना यांच्यादरम्यान विजेतेपदासाठी झालेली चुरशीची लढत आजही आठवते. या शोचा विजेता अभिजीत सावंत ठरला होता, तर अमित उपविजेता ठरला होता. मध्यंतरी यावरुनच अमित सानाने एक खळबळजनक विधान केले होते ज्यामुळे तो चर्चेत आला होता. अभिजीत सावंत राजकीय प्रभावामुळे हा शो जिंकला असल्याचा दावा अमितने केला होता. यावर अभिजीत सावंतनेही समोर येऊन स्पष्टीकरण दिलं होतं.
परंतु हा शो जिंकल्यानंतर एक अल्बम आणि काही मोजकी गाणी सोडली तर अभिजीत फारसा पुढे आला नाही. अभिजीत फारसा पुढे येत नसला तरी तो त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी वेगवेगळे शोज करत होता अन् आजही त्याच्या गाण्याच्या माध्यमातून अभिजीत जवळपास ७०% कमाई करतो असं नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
आणखी वाचा : ‘भूल भूलैया ३’मध्ये पुन्हा विद्या बालन का? दिग्दर्शकाने दिलं स्पष्ट उत्तर
‘द म्युझिक पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिजीतने त्याच्या एकूणच लाईफस्टाईलविषयी अन् त्याच्या वर्षाच्या कमाईबद्दल खुलासा केला आहे. अभिजीत म्हणाला, “मी वर्षाला इतके पैसे कमावतो की एक आरामदायी आयुष्य जगू शकेन. स्टेज परफॉर्मन्स, आणि लाईव्ह शोज हे माझ्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहेत. माझे जुने अल्बम आणि गाणी यातून मिळणारी रॉयल्टीची रक्कम ही फार कमी आहे. सोनी टेलिव्हिजन मात्र मला नेहमी माझा रॉयल्टीचा चेक घेण्यासाठी आठवण करते.”
याबरोबरच अभिजीतने त्याच्या लाईव्ह शोजबद्दलही भाष्य केलं. तो म्हणाला, “मी सर्वप्रकारचे लाईव्ह शोज करतो. सार्वजनिक शोज ते खासगी कार्यक्रम, कौटुंबिक तसेच कॉर्पोरेट शोज. मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराला सर्व यायला हवं. स्टेजवर परफॉर्म करत असतानाच मला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात. मी माझा सर्वाधिक वेळ हा स्टेजवर घालवतो कारण तो माझा व्यवसाय आहे त्यावर माझं पोटपाणी अवलंबून आहे.”