‘स्कॅम १९९२’सारखी यशस्वी वेब सीरिज दिल्यानंतर करिश्मा तन्ना या अभिनेत्रीला घेऊन दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ‘स्कूप’ ही नवीन वेबसीरिज सादर केली. प्रेक्षकांनी या सीरिजला डोक्यावर घेतलं. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सीरिजला पुरस्कारही मिळाला. हंसल मेहता यांची ही वेबसीरिज क्राइम रोपोर्टर जिग्ना वोराच्या ‘बिहाइंड बार्स इं भायखळा; माय डेज इन प्रीजन’ या पुस्तकावर बेतलेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेब सीरिजमुळे जिग्ना वोरा पुन्हा चर्चेत आली अन् आता तिची ‘बिग बॉस १७’मध्ये एंट्री झाली आहे. भायखळा जेल ते बिग बॉसचं घर हा प्रवास जिग्नासाठी फारच खडतर होता. नुकतंच तिने ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना या सगळ्यावर प्रकाश टाकला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात येण्यासाठी तिला तिच्या मुलाने फार प्रोत्साहन दिलं.

आणखी वाचा : ‘अंकुश’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर ट्रोल होणारा दिपराज घुले आहे तरी कोण?

याविषयी बोलताना जिग्ना म्हणाली, “माझा मुलगा २३ वर्षांचा आहे अन् त्याला वाटतं आईबाबत घडलेली ही सत्यघटना साऱ्या जगापर्यंत पोहोचावी. त्याच्यामुळेच मी आज इथे आहे. त्याने मला समजावलं की वेब सीरिजनंतर हे खूप मोठं पाऊल आहे. त्याचं म्हणणं असं पडलं की पुस्तक १०० जणांनी वाचलं, हजारोंनी माझी गोष्ट सीरिजमधून अनुभवली, पण बिग बॉससारख्या माध्यमातून मी करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकते.”

‘बिग बॉस’सारख्या शोकडून जिग्नाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत याबद्दल ती उत्तर देताना म्हणाली, “मी जशी आहे तसंच राहायला मला आवडतं. मी लढणारी आहे, दुःख कुरवाळणारी नव्हे. मी बिचारी आहे म्हणून कुणी मला तशी वागणूक देऊ नये. माझ्याबरोबर जे काही घडलं ते मागे सोडून पुढे जायचं मी ठरवलं आहे. ‘स्कूप’ सीरिजनंतर लोकांना समजलं आहे की मी एक सशक्त स्त्री आहे आणि शोमध्ये सुद्धा लोकांना मी त्याच रूपात दिसेन.”

जिग्ना वोराला ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जिग्ना वोरा ‘एशियन एज’ची पत्रकार होती. मिड-डे रिपोर्टर ज्योतिर्मय डे यांच्या हत्येतील दोन प्रमुख संशयितांपैकी ती एक होती. ज्योतिर्मय डे यांची ११ जून २०११ रोजी पवईतील हिरानंदानी येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. प्राथमिक तपासानंतर मुंबई पोलिसांनी राजन आणि जिग्ना वोरा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. २०१६ मध्ये ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली. मुंबई पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०११ रोजी जिग्ना वोराला चौकशीच्या संदर्भात ताब्यात घेतले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From byculla jail to bigg boss house jigna vora exclusive scoop on entering bigg boss 17 avn