टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला ‘अलीबाबा दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबीयांसह मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला आहे. तर, तिच्या आईची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. तुनिषा आत्महत्या प्रकरणात सध्या तिचा सह-कलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खान पोलीस कोठडीत आहे. तुनिषाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज म्हणजेच FWICE ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार तुनिषा शर्माच्या प्रकरणानंतर FWICEचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “मनोरंजन उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कलाकाराने सेटवर असं पाऊल उचलल आहे. खरं तर हा एक प्रकारे चुकीचा ट्रेंड सुरू झाला आहे. हे त्वरित थांबवण्याची गरज आहे. आपल्या फेडरेशनने यावर गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची वेळ आली आहे,” असं तिवारी यांनी म्हटलंय.
“फेडरेशन निर्मात्यांना एक पत्र लिहित आहे. जेणेकरून अशा कृत्यांना प्रोत्साहन मिळणार नाही. आता तुम्ही त्या शोचा विचार करा, त्यातील हिरोईनने आत्महत्या केली, हिरोला अटक झाली आहे, सेट बनून तयार झाला आणि शूटिंग थांबलं आहे. तो मालिकेचा आतापर्यंतचा सर्वात महागडा सेट आहे. अशा परिस्थितीत निर्मात्याचं काय झालं असेल, याचाही विचार करणं आवश्यक आहे. तुनिषाच्या आत्महत्येमुळे एक निर्माता अक्षरशः संपला आहे. तो लोकांना कामाचे पैसे कसा देईल, त्याच्यावर किती कर्ज होईल, हे सांगता येत नाही,” असंही तिवारी म्हणाले.