प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाच्या १४व्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. स्टंटवर आधारित असलेला ‘खतरों के खिलाडी’चं १४वं पर्व लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. तसंच निर्माते देखील या कार्यक्रमाच्या तयारीत आहेत. अशातच ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात झळकणाऱ्या स्पर्धकांची नाव जाहीर झाली आहेत. यामध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं देखील नाव आहे. जाणून घ्या यंदा ‘खतरों के खिलाडी’मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहेत.
हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आणि ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वात पाहायला मिळालेली अभिनेत्री निमृत कौर आहलूविया ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात दिसणार आहे. तसंच जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ रोहित शेट्टीच्या या लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वातून कृष्णा टेलिव्हिजनवर पदार्पण करत असल्याचं म्हटलं जात आहे. टायगरची बहीण फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळे इतर कलाकारांसाठी ती तगडी स्पर्धक असणार आहे.
हेही वाचा – नवरी मिळे हिटलरला: एजेच्या हळदीत लीलाचा ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात झळकणाऱ्या सदस्याच्या यादीत ‘कपिल शर्मा शो’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचं नाव आहे. अभिनेत्री नियति फतनानी, करण वीर मेहरा, अदिती शर्मा हे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरे देखील यंदा ‘खतरों के खिलाडी’ पाहायला मिळणार आहेत.
निमृत व्यतिरिक्त ‘बिग बॉस’मधील आणखी चार सदस्य ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात दिसणार आहेत. ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वातला अभिनेता अभिषेक कुमार आणि अभिनेता समर्थ जुरैल स्टंट करताना पाहायला मिळणार आहेत. याशिवाय ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वातील शालिन भनोट आणि ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वातील आसिम रियाज देखील ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात झळकणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे रोहित शेट्टीच्या या लोकप्रिय कार्यक्रमात मराठीतील प्रसिद्ध अभिनेता असणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी यंदा ‘खतरों के खिलाडी’मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात त्याने स्वतः खुलासा केला होता.
‘टाइम्स नाउ’शी बातचित करताना गश्मीर म्हणाला होता की, मी नवीन प्रवासासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या भीतीचा सामना करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. रोहित शेट्टीच्या कार्यक्रमासाठी मी माझ्या दैनंदिन जीवनात बदल केला आहे. मला नवीन वेळेशी जुळवून घ्यायचं असल्याने मी दिनचर्येचं खूप पालन करत आहे. मी वर्कआउट कधीच चुकवत नाहीये. मी फक्त माझ्या शारिरीक तंदुरुस्तीवरच लक्ष देत नसून मानसिक तंदुरुस्तीची देखील काळजी घेत आहे. कारण ते खूप महत्त्वाचे आहे. मी माझ्या मुलाशिवाय ५ दिवसही लांब राहू शकत नाही. त्यामुळे मानसिकरित्या या गोष्टीची तयारी करत आहे.