सध्या मराठी मालिकाविश्वात सतत काहींना काहीतरी घडताना दिसत आहे. एकाबाजूला नवनवीन मराठी मालिका सुरू होतं आहेत. तर दुसऱ्याबाजूला जुन्या मराठी मालिका आणि हिंदीतील लोकप्रिय मालिका मराठीत डब करून दाखवल्या जात आहेत. त्यामुळे आता दोन लोकप्रिय मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवर हिंदी डब मालिका दाखवल्या जात आहेत. त्यामुळे ‘सोनी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिका नुकत्याच बंद झाल्या आहेत. जून २०२१मध्ये सुरू झालेली ‘गाथा नवनाथांची’ मालिका ऑफ एअर झाली आहे. शनिवारी, ४ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेत नवनाथांची जीवनकथा दाखवण्यात आली होती. अभिनेता जयेश शेवाळकर, अनिरुद्ध जोशी, नकुल घाणेकर, मनोज गुरव, सुरभी हांडे, मृदुला कुलकर्णी, प्रतिक्षा जाधव, प्रथमेश विवेकी, शंतनु गंगणे असे बरेच कलाकार मंडळी ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत पाहायला मिळाले होते. गेल्या साडे तीन वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि ४ जानेवारीला शेवटचा भाग प्रसारित झाला. यानिमित्ताने ‘सोनी मराठी’च्या सोशल मीडियावर खास पोस्ट करण्यात आली आहे.
हेही वाचा – Video: न्यू इअरचं सेलिब्रेशन करून रणबीर कपूर-आलिया भट्ट राहासह मुंबईत परतले, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
‘सोनी मराठी’ने ‘गाथा नवनाथांची’ मालिकेचं पोस्टर शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “‘गाथा नवनाथांची’ या मालिकेवर नाथ भक्त आणि प्रेक्षकांनी दाखवलेल्या प्रेम आणि प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!,” असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. पण यावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मालिका का बंद केली? आम्ही रोज पाहायचो…चांगली मालिका होती’, ‘नवनाथांचं चरित्र उघडपणे दाखवणारी अशी मालिका पुन्हा होणे शक्य नाही’, ‘मालिका एवढ्या लवकर काय संपवली?’, ‘हे बंद करून काय डब मालिका लावणार? काय मुर्खपणा चाललाय’, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ने शनिवारी केली ‘इतकी’ कमाई
‘गाथा नवनाथांची’सह ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही देखील मालिका बंद झाली आहे. सुहानी नाईक, विजया बाबर, वीणा जामकर, विक्रम गायकवाड असे अनेक कलाकार असलेली ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ही मालिका चांगली लोकप्रिय ठरली. २०२२पासून सुरू झालेली ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले. पण, ४ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यासंदर्भातही ‘सोनी मराठी’च्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, याआधी ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत झळकले होते. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेत पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. मराठी मालिकाविश्वात हे पहिल्यांदाच घडलं. पण अवघ्या पाच महिन्यातच ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा गाशा गुंडाळण्यात आला.