‘अनुपमा’मध्ये दमदार भूमिका करणारा अभिनेता गौरव खन्ना सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमुळे चर्चेत आहे. चविष्ट पदार्थ बनवून परीक्षकांची मनं जिंकणाऱ्या गौरवच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार लोकांना माहीत नाही. ४३ वर्षांचा गौरव खन्ना विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव आकांक्षा चमोला आहे. ४१ वर्षांची आकांक्षा अभिनेत्री आहे. तिने काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

गौरव व आकांक्षाच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत, पण अद्याप त्यांना बाळ नाही. याबद्दल आकांक्षाने एका मुलाखतीत तिचं मत व्यक्त केलं होतं. तसेच पती गौरवचं कौतुकही केलं होतं.

आकांक्षा चमोलाने कोणत्या मालिका केल्यात?

आकांक्षाने ‘स्वरागिनी’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. हा शो २०१५ ते २०१६ मध्ये प्रसारित झाला होता. नंतर तिने ‘भूतू’ नावाचा शो केला. त्यानंतर २०२२ मध्ये तिने कॅन यू सीमध्ये काम केलं. आकांक्षा मूळची मुंबईची असून तिने कॉमर्समध्ये पदवीचं शिक्षण घेतलंय.

गौरव व आकांक्षाची भेट आणि ९ वर्षांपूर्वी केलं लग्न

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये गौरवने सांगितलं की तो एका ऑडिशनच्या निमित्ताने आकांक्षाला भेटला होता. त्याला आकांक्षा आवडली होती, पण तिला याबद्दल कल्पना नव्हती. तिच्याशी बोलण्यासाठी गौरव खोटं बोलला होता. गौरवने आकांक्षाला काम मिळवण्यासाठी काय करावं लागेल, असं विचारलं होतं. तसेच स्वतःचं नाव गौरव नाही तर राकेश सांगितलं होतं. आकांक्षाने दुसऱ्या एका ऑडिशनसाठी गौरवला सोबत यायला सांगितलं. त्यानंतर गौरवने आकांक्षाला त्याचं नाव गुगल करायला सांगितलं आणि अशा रितीने त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. काही काळ डेट केल्यावर गौरव खन्ना व आकांक्षा चमोला यांनी २०१६ मध्ये लग्न केलं. त्यांचं लग्न गौरवच्या कानपूर येथील घरी झालं होतं.

आकांक्षा गरोदर असल्याची झालेली चर्चा

गौरव खन्ना व आकांक्षा चमोला यांना बाळाबद्दल बरेचदा विचारलं जातं. २०२३ मध्ये गौरव व आकांक्षा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र गौरवने हे वृत्त फेटाळले होते. आकांक्षा गरोदर नाही, तिला फ्राइज खायच्या होत्या, त्यामुळे तिचं वजन वाढलंय, असं गौरव गमतीत म्हणाला होता.

गौरव खन्ना व आकांक्षा चमोला (फोटो – इन्स्टाग्राम)

आकांक्षा बाळाबद्दल काय म्हणते?

रुचिता शर्माशी बोलताना आकांक्षाने म्हटलं की तिला बरेचदा बाळाबद्दल विचारलं जातं. पण आपण गौरव या मोठ्या बाळाची काळजी घेत असल्याचं ती गमतीत म्हणाली होती. तसेच गौरवला मुलं हवी आहेत, पण आकांक्षा अद्याप बाळासाठी तयार नाही. पती व सासू-सासऱ्यांनी कधीच बाळासाठी दबाव आणला नाही, असं म्हणत आकांक्षाने कौतुक केलं होतं.