‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असं म्हणत आपल्या विनोदी शैलीने अभिनेता गौरव मोरेनं प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरवला नवी ओळख मिळाली. या कार्यक्रमातून तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आज त्याचा चाहत्यावर्ग महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातही आहे. अशा या प्रसिद्ध गौरव मोरेच्या एका डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता गौरव मोरे सध्या हिंदीतील लोकप्रिय कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये काम करत आहे. या कार्यक्रमातील त्याचं प्रत्येक स्किट चांगलंच गाजत आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होतं असतात. या कार्यक्रमात गौरवसह मराठीतील अभिनेता कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि हेमांगी कवी देखील काम करत आहेत. अशातच गौरवने ‘मॅडनेस मचाएंगे’च्या मंचावर अमिताभ बच्चन व अमृता सिंह यांच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – “कृपा करुन आम्हाला जगायला…” लोकसभा निवडणुकीबद्दल शशांक केतकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला…
या व्हिडीओत, गौरव बार्बीच्या ड्रेसमध्ये असलेल्या अभिनेत्रीबरोबर अमिताभ बच्चन व अमृता सिंह यांच्या ‘सुन रुबिया तुमसे प्यार हो गया’ गाण्यावर डान्स करत आहे. गौरवसह जबरदस्त डान्स करणारी बार्बी ड्रेसमधील ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हेमांगी कवी आहे. गौरव व हेमांगीचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दोघांच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तुम्ही दोघं माझे आवडते आहात”, “गौरव-हेमांगी तुम्ही खूप छान डान्स करता”, “दोघेपण भारी दिसताय”, “कडक”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
हेही वाचा – “आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा…”, डॉ. अमोल कोल्हेंच्या विजयावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा १४ जूनला ‘अल्याड पल्याड’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रितम एस के पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात गौरवसह अभिनेते मकरंद देशपांडे, सक्षम कुलकर्णी पाहायला मिळणार आहे. याशिवाय गौरव प्रसाद ओकसह ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातही झळकणार आहे. याआधी ‘अंकुश’, ‘बॉईज ४’, ‘लंडन मिसळ’, ‘सलमान सोसायटी’ या चित्रपटांमध्ये गौरव पाहायला मिळाला होता.