‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आणि विनोदवीर म्हणजेच गौरव मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून गौरव मोरेने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘बाळकडू’, ‘संजू’, ‘विकी वेलिंगकर’ आणि आता ‘बॉईज ४’ अशा चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत गौरवने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे.
गौरव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अभिनय क्षेत्रातील अनेक गोष्टी, किस्से तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. गौरव सध्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. नुकताच त्याचा ‘भुलभुलैया’ चित्रपटातील छोटे पंडितचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशातच गौरवने त्याचा नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. गौरवचा हा अवतार पाहून त्याला ओळखणं फारच कठीण आहे.
‘बाहुबली’ या सुप्रसिद्ध चित्रपटात मुख्य भूमिकांसोबतच खलनायकाची म्हणजे ‘कालकेय’ची भूमिकाही प्रचंड गाजली होती. कालकेय एकूण त्याच्या लूकमुळे आणि भाषेमुळे प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. याचीच भूमिका आता गौरव मोरे ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये करणार असल्याचं या लूकमुळे दिसून येतंय. मोठे केस, शरीरावर रक्त आणि मार लागल्याच्या खुणा, पोशाख अगदी पात्रासारखाच, एक खोटा डोळा अशाप्रकारचा पेहराव गौरवने या फोटोमध्ये केला आहे.
गौरवचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या आहेत. अभिनेत्री नम्रता रुद्राज कमेंट करत म्हणाली, कडक गौऱ्या. एका चाहत्याने कमेंट करत विचारलं, “भाई बाहुबली-३ मध्ये रोल मिळाला का?” “कमाल, मेकअप मॅनसाठी सलाम”, अशी कमेंट दुसऱ्याने केली.
“ओळखलंच नाही यार”, अशी कमेंट एकाने केली. “आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, असं एका युजरने कमेंट करत लिहिलं.
“अजिबात ओळखू येत नाही, खरा कालकेय आहे असंच वाटते.” “आयला, सेम टू सेम राव, मला तर खरंच वाटलं कालकेय आला की काय”, “अरे गौरव एवढा मेकअप करायची गरजच नव्हती”, अशा अनेक कमेंट्स गौरवच्या या फोटोवर आल्या आहेत.
हेही वाचा… “लवकर लग्न करा”, भूषण प्रधान व अनुषा दांडेकरच्या ‘त्या’ फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स
दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या गौरव हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये काम करत आहे. या शोमध्ये त्याच्यासह कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.