छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या सहा वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. ज्याप्रमाणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे चाहते आहेत, त्याप्रमाणे या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीरांचा सुद्धा एक वेगळा चाहतावर्ग आहे. तसंच आता हे विनोदवीर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत काम करताना दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे गौरव मोरे. गेल्यावर्षी गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला रामराम करत हिंदीतील ‘मॅडनेस मचाएंगे’ या विनोदी कार्यक्रमात एन्ट्री केली. या कार्यक्रमातूनही त्याने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. गौरव लवकरच वेगवेगळ्या चित्रपटांमधून भेटीस येणार आहे. नुकतीच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता गौरव मोरेने इन्स्टाग्राम स्टोरीवर विमानातला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौरवबरोबर मराठीतील लोकप्रिय विनोदवीर आहेत. पंढरीनाथ कांबळे आणि सुप्रिया पाठारे गौरवबरोबर पाहायला मिळत आहे. एका कार्यक्रमानिमित्ताने तिघांची खास भेट झाली आहे. याच फोटोवर गौरवने लिहिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे.

गौरव मोरेने पंढरीनाथ कांबळे, सुप्रिया पाठारे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “यांच्याबरोबर काम करायला कोणत्याही चॅनेल, प्रोडक्शनची परवानगी लागत नाही. नाहीतर काही काही चॅनेल प्रोडक्शनला वाटतं आम्ही देव आहोत.” या कॅप्शनच्या पुढे गौरवने हसण्याचा इमोजी दिला आहे.

गौरव मोरे इन्स्टाग्राम स्टोरी
गौरव मोरे इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तो ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. ११ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गौरवसह मिलिंद शिंदे, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, अभिजीत चव्हाण, संजय कुलकर्णी, चिन्मय उदगीरकर असे बरेच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. जानेवारीमध्ये त्याचा ‘सांगी’ नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो अभिनेता शरिब हाशमी, विद्या माळवदे यांच्याबरोबर काम करताना पाहायला मिळाला होता. तसंच नुकत्याच पार पडलेल्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात गौरवने जबरदस्त परफॉर्मन्स केला. श्रेया बुगडे, ओंकार भोजने यांच्याबरोबर त्याची धमाल स्किट झाली.

Story img Loader