‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं आणि गौरव मोरे यांचं एक वेगळं समीकरण तयार झालं होतं. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने हा शो सोडला. गौरवने हास्यजत्रा सोडणं हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का होता. त्याने ‘मी हास्यजत्रा सोडतोय’ या शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करून नाराजी दर्शवत होते. गौरवला हा शो सोडू नकोस अशी विनंती त्याचे चाहते सतत करत होते आणि आजही त्याच्या प्रत्येक पोस्टवर यासंदर्भात प्रतिक्रिया येत असताता. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे त्याला घराघरांत लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे हा तुफान गाजणारा शो गौरवने का सोडला याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकत्याच ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत गौरवने याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

गौरव मोरे याबद्दल सांगताना म्हणाला, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सोडण्यामागे कारण असं काहीच नव्हतं. फक्त माझ्यामध्ये तोच-तोचपणा खूप जास्त येत होता. माझ्याकडून संवाद बोलण्याआधी रिअ‍ॅक्शन येत होत्या. सलग पाच वर्षे मी हास्यजत्रेत काम केलंय त्यामुळे त्या सगळ्याची मला एक सवय झाली होती. मला असं वाटलं आपण खूपच मॅकेनिकल नाही ना झालोय?…तेव्हा असं जाणवलं की, आपण थोडं थांबायला पाहिजे.”

हेही वाचा : गौरव मोरेने घेतली खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट! दिली खास भेटवस्तू, फोटो शेअर करत म्हणाला…

गौरव पुढे म्हणाला, “थांबायला पाहिजे असं वाटत असतानाच मला हिंदीत काम आलं. सुरुवातीला मला त्यांनी एक दिवसासाठी बोलावलं होतं. पण, त्यानंतर समजलं ती मालिका मर्यादित भागांची आहे. फक्त जूनपर्यंत असेल. म्हणून ठरवलं की जूनपर्यंतच आहे मग आपण करुया. तिथे हास्यजत्रेपेक्षा कामाचं स्वरुप वेगळं होतं. हिंदीत असल्याने त्याठिकाणी माझ्या इथल्यासारख्या रिअ‍ॅक्शन आल्या नसत्या.”

“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडतोय याचा थोडाफार अंदाज मी सेटवर सर्वांनाच दिला होता. सगळे बोलत होते तू ब्रेक घे…त्यानंतर पुन्हा ये. त्यावेळी मी गोस्वामी सरांना ‘माझ्याकडून सर हे नाही होणार’ असं सांगितलं आणि अर्थात त्यांना माझी यामागची कारणं सांगितली. पण, कितीही काही झालं तरी मी कायम हेच म्हणेन की, माझी ओळख ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमामुळे आहे. माझ्या नावापुढे नेहमी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे असं लिहिलं जातं आणि ही गोष्ट कधीच पुसली जाणार नाही. माझी हास्यजत्रा फेम ही ओळख कायम राहणार असं मला वाटतं. त्यामुळे जे मला आज ट्रोल करत आहेत त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. ज्या शोमुळे तुला ओळख मिळाली तिथून जाऊ नकोस हेच सगळ्या लोकांचं म्हणणं आहे.” असं मत या फिल्टरपाड्याच्या बच्चनने मांडलं.

हेही वाचा : फक्त दोन कोटींचे बजेट अन् चित्रपटाने ४२ वर्षांपूर्वी कमावले होते १०० कोटी, तुम्ही पाहिलाय का हा बॉलीवूड सिनेमा?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर तू काय मिस करतोय? असा प्रश्न विचारला असता गौरव म्हणाला, “सगळंच मिस करतोय…स्टेज, माझी माणसं अगदी सगळंच! कारण, एका ठिकाणी पाच वर्षे काम करणं ही मोठी गोष्ट आहे. कोव्हिडमध्ये सुद्धा आम्ही एकत्र होतो त्यामुळे त्या सर्वांना मी कायम मिस करेन. याशिवाय सगळे कलाकार माझ्या नव्या कामाचं कौतुक करत मला प्रोत्साहन देत आहेत.”