आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. दुर्गम भागातील एका खेडे गावात भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याचा शोध लवकरच ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड’ हा भयपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?

‘अल्याड पल्याड’चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस. के. पाटील यांचं आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदी कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : “जगभरातील प्रेक्षकांकडून…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी वनिता खरातची पोस्ट; शेअर केला सिंगापूरमधील Unseen व्हिडीओ

रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच संपन्न झाला. दुर्गम भागातील एका खेडे गावाची ही कथा आहे. या गावातील माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. सरते शेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेचा आढावा मुख्य कलाकार कसा घेणार? यामागचं नेमकं सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी ट्रेलर लॉन्च सोहळ्यात व्यक्त केला आहे.  

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचा ट्रेलर

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड कलाकार दिसणार ‘या’ ड्रेसकोडमध्ये; पाहुण्यांसाठी जेवणाचा मेन्यू आहे खूपच खास

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक नवा थरारक भयपट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. सध्या नेटकरी या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तो हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याच्या जोडीला कुशल बद्रिके, हेमांगी कवी असे कलाकार आहेत.