अभिनेता गौरव मोरे गेली अनेक वर्षे विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरवला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. छोटा पडदा गाजवल्यानंतर त्याने मोठ्या पडद्यावर सुद्धा आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या विनोदवीराने नुकतीच ‘व्हायफळ’ युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
गौरवने यावेळी शाळेतल्या आठवणी, संघर्षाचा काळ, सिनेमाची आवड याबद्दल आपली दिलखुलास मतं मांडली. सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केल्यावर आज गौरवला एवढं मोठं यश मिळालं आहे.
गौरव सांगतो, “मी लहान असताना संजय दत्तचा ‘वास्तव’ चित्रपट पाहिला होता. त्यावेळी आम्हा मित्रांमध्ये चर्चा रंगली होती. आम्ही सगळे बोलायचो पावभाजीचा धंदा करूया. “पिक्चरमध्ये पाहिलं ना तू पावभाजीचा धंदा करून किती पैसे कमावता येतात…आपण पण तेच करूया. कारण, पावभाजीच्या धंद्यातच पैसा आहे.” अशी चर्चा आम्हा मित्रांमध्ये व्हायची.
गौरव पुढे म्हणाला, “याशिवाय आमच्या परिसरात एक चहावाला होता. त्याला शाळा सुटल्यावर आम्ही मदत करायचो. त्याचा व्यवसाय पाहून माझ्या आणि मित्रांच्या डोक्यात यायचं चला चहाची टपरी टाकूया. चहाच्या टपरीत पैसा आहे. पावभाजीची गाडी किंवा चहा विकायचा ही सगळी तेव्हा आमची स्वप्न होती. आता पण, मित्र भेटतात तेव्हा विषय निघतो आणि ते म्हणतात, “काय रे! मग करूया का चहाचा धंदा आता तर दहा रुपये चहा आहे” अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आमच्या डोक्यात होत्या.”
हेही वाचा : खरा कोकणी माणूस! रेल्वे अन् एसटीतून प्रवास करत चिपळूणला पोहोचला प्रसिद्ध अभिनेता, नेटकरी म्हणाले…
दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये काम करत आहे. या शोमध्ये त्याच्यासह कुशल बद्रिके, हेमांगी कवी हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.