‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आणि विनोदवीर म्हणजेच गौरव मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून गौरव मोरेने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘बाळकडू’, ‘संजू’, ‘विकी वेलिंगकर’ आणि आता ‘बॉईज ४’ अशा चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत गौरवने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे.
छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा गौरवचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
हेही वाचा… थरारक चित्रपट ‘शैतान’ आता येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
‘व्हायफळ’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा गौरव मोरेला कोणत्या प्रकारचे काम करायला आवडेल? असं विचारण्यात आले तेव्हा गौरव म्हणाला, “मला सगळ्या प्रकारचं काम करायचे आहे. एखाद्या आर्ट फिल्ममध्ये मला काम करायला आवडेल. लहानपणापासून मी दिपा मेहता यांचे चित्रपट बघत आलोय म्हणून मला असे वाटते की एक दोन आर्ट फिल्म मी केल्या पाहिजेत, ज्याला पुरस्कार मिळतील अशा सिनेमांमध्ये मला काम करायचंय.”
गौरव पुढे म्हणाला, “.यामुळे अभिनेता म्हणून आपण किती पाण्यात आहोत हे सुद्धा मला बघायला मिळेल. भूमिका बाकी ज्या काही असतील त्या मी स्वीकारेनच. कारण लेखक लिहितील, दिग्दर्शक आपल्यावर विश्वास ठेवतील आणि आपण त्यापद्धतीने काम करू. पण आर्ट फिल्ममध्ये काम करायची माझी खूप इच्छा आहे.”
गौरवने प्रेक्षकांसाठी काही चित्रपटांची नावेही सूचवली. शाळेतील आठवणींपासून ते पवईतल्या घरापर्यंत गौरवने या मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारल्या. अभिनयाच्या या उच्च शिखरापर्यंत पोहोचताना त्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. अभिनयाच्या प्रवासाबद्दल बोलताना गौरवला सतत काम करायला खूप आवडत हे त्याने सांगितलं.
हेही वाचा… “सिगारेट ओढायला माझ्या वडिलांनी शिकवलं”, अभिनेत्री सुप्रिया पाठारे किस्सा सांगत म्हणाल्या…
दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या गौरव हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये काम करत आहे. या शोमध्ये त्याच्यासह कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.