अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गौतमीने तिची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि स्वतःच्या टॅलेंटने वेगळं स्थान निर्माण केलं. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. तर आता तिच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
गौतमी आणि मृण्मयी या दोघींचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्या दोघीही त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. विविध पोस्ट शेअर करत त्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांना सांगत असतात. तर आता मृण्मयीने शेअर केलेल्या काही फोटोंनी चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातील एका फोटोमुळे गौतमी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा : गौतमी देशपांडेचा तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा, बॉयफ्रेंडचा फोटो पोस्ट करत म्हणाली…
गौतमी आणि मृण्मयी यांनी नुकतीच एका जवळच्या व्यक्तीच्या लग्नात हजेरी लावली. यावेळी मृण्मयीबरोबर तिचा नवरा स्वप्नील रावही होता. मृण्मयी स्वप्निल आणि गौतम यांनी मिळून या लग्नात भरपूर फोटो काढले. त्यातील काही मोजके फोटो मृण्मयीने सोशल मीडियावर पोस्ट केले. परंतु त्यातील एका फोटोमध्ये स्वप्निल, मृण्मयी, गौतमी यांच्याबरोबर गौतमीच्या बाजूला उभं राहून, तिच्या खांद्यावर हात ठेवून अभिनेता स्वानंद तेंडुलकर पोज देताना दिसत आहे. त्यावरून स्वानंद आणि गौतमी एकमेकांना डेट करत आहेत की काय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
हेही वाचा : Video: “मला त्रास देणं बंद कर…” वैतागलेल्या गौतमीला बहिणीचं भन्नाट उत्तर, म्हणाली…
मृण्मयीने हा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. “आता तुम्ही तुमचा रिलेशनशिप स्टेटस जाहीर करून टाका”, असं त्यांनी गौतमी आणि स्वानंदला कमेंट करत म्हटलं. फक्त चाहतेच नाही तर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील या पोस्टवर कमेंट केली आणि लिहिलं, “अरे स्वानंद तेंडुलकर !!!” त्याला रिप्लाय देत मृण्मयी म्हणाली, “हम्म्म्म हम्म्म्म हम्म्म्म्म्म्म”. त्यामुळे आता या चर्चांवर गौतमी आणि स्वानंद काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.