मराठी चित्रपटसृष्टीतील असंख्य कलाकार रोज जवळपास दहा ते बारा तास काम करतात. चित्रपट आणि मालिकांच्या सेटवर अनेकदा दिवसभर धावपळ करावी लागते. मात्र एवढी मेहनत करूनही कलाकारांना वेळेवर मानधन मिळत नाही. तीन ते चार महिने उलटूनही हक्काचे पैसे मिळत नाहीत. याविषयी असंख्य कलाकारांनी उघडपणे आपलं मत मांडलं आहे. सोशल मीडियावर हे कलाकार व्यक्त होत असतात. आता असाच काहीसा अनुभव अभिनेत्री गौतमी देशपांडेला आला आहे.
हेही वाचा : सायलीच्या पायावरची जन्मखूण कोणाला दिसणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, जुई गडकरी म्हणाली…
गौतमी देशपाडेंने इन्स्टाग्रामवर मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कामाचं मानधन वेळेवर न मिळाल्याने अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये गौतमीने समोरच्या व्यक्तीला ‘पैसे ट्रान्सफर केले का?’ असा मेसेज केला. यानंतर अभिनेत्रीला ‘थांबा, चेक करते’ असं उत्तर देण्यात आलं. पुढे दोन दिवस उलटूनही पैसे न मिळाल्याने गौतमीने पुन्हा मेसेज करत, “मी तुम्हाला संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. एखाद्या कलाकाराला एखाद्या गोष्टीसाठी एवढ्या वेळा पाठपुरावा करावा लागतो हे खरोखरचं अस्वीकार्य आहे. सोमवारपर्यंत माझे पैसे मला ट्रान्सफर करा.” असं लिहिलं.
गौतमीने पुढच्या मेसेजमध्ये, “तुम्ही उत्तर पण देऊ शकत नाही का? जर, मला उत्तर देण्याचं सौजन्य तुमच्यामध्ये नसेल तर या सगळा प्रकार मी इन्स्टाग्रामवर शेअर करणार आहे.” अशी ताकीद दिली होती. गौतमीला समोरून काहीच उत्तर तिला मिळालं नाही आणि हा सगळा प्रकार अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला.
हेही वाचा : “चित्रपटगृहांकडे भीक मागावी लागते”, मराठमोळ्या अभिनेत्याने व्यक्त केली खंत; म्हणाला, “महाराष्ट्रात राहून…”
“जेव्हा पैशांचा प्रश्न येतो…तेव्हा लोक असं वागतात. मला या क्षणी खरंच खूप वाईट वाटतंय. आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला असा मिळतो आणि स्वत:च्या पैशांसाठी पाठपुरावा करावा लागतो.” असं गौतमीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. दरम्यान, गौतमीने या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. फक्त कामाचा मोबदला मिळावी ही तिची मागणी आहे. यापूर्वी शशांक केतकर, शर्मिष्ठा राऊतस, संग्राम समेळ यांसारख्या कलाकारांना सुद्धा या समस्येचा सामना करावा लागला होता.