अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात थाटामाटात पार पडला. दोघेही गेल्या २ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या दोन दिवस आधी सोशल मीडियावर या जोडप्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. गौतमी-स्वानंदने लग्नाची घोषणा करताच त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. या दोघांच्या लग्नसोहळ्यामुळे ‘स्वॅग’ आणि ‘लफडी’ असे दोन हॅशटॅग प्रचंड चर्चेत आले. स्वॅगचा अर्थ स्वानंद-गौतमी असा आहे ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण, लफडी म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न या जोडप्याच्या असंख्य चाहत्यांना पडला होता. अखेर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वानंद-गौतमीने याबद्दल खुलासा केला आहे.
स्वानंद-गौतमीच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सगळ्या फोटोंना त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी लफडी असा हॅशटॅग दिला होता. या हॅशटॅगमागचा अर्थ या दोघांनी राजश्री मराठीच्या मुलाखतीत सांगितला आहे. स्वानंद म्हणाला, “आमच्या ओळखीमधल्या काही लोकांना आमची लफडी चालू आहेत हे माहीत होतं. याशिवाय माझ्या ऑफिसमध्ये आमची एक लफडी गँग आहे आणि आमच्या या गँगचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. आम्ही दोघंही खूप वर्षांपासून एकत्र असल्याने आमचे काही मित्र ‘अरे यांची लफडी चालू आहेत’ असं म्हणायचे. त्यामुळे या सगळ्यावरून लग्नात आम्ही लफडी हॅशटॅग वापरायचा असं ठरवलं.”
गौतमी याबद्दल म्हणाली, “स्वानंद बऱ्याचवेळा मला ‘ए तू लफडी करू नकोस हा’ किंवा ‘लफडी मत कर’ असं सांगत असतो. चालता-बोलता नेहमी त्याच्या तोंडात लफडी हा शब्द असतो. शेवटी लग्न करताना तो म्हणाला, आता आपण लफडी हा हॅशटॅग करून टाकूया. स्वानंदच्या ऑफिसच्या लोकांमुळे लफडी हॅशटॅगची सर्वात जास्त चर्चा रंगली आणि शेवटी ‘स्वॅग’पेक्षा जास्त ‘लफडी’ हा हॅशटॅग व्हायरल झाला.”
हेही वाचा : ‘तू चाल पुढं’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग
दरम्यान, स्वानंद-गौतमीबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती ‘गालिब’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याशिवाय स्वानंद भाडीपा या मराठी सीरिज बनवणाऱ्या कंपनीचा व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहतो.