Bigg Boss Marathi Season 5 : सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आठवा आठवडा सुरू आहे. आता नऊ सदस्य घरात आहेत. या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता या चार सदस्यांपैकी कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच सहाव्या आठवड्यात बाहेर गेलेला घनःश्याम दरवडे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी मोठ्या बहिणीसह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये घनःश्यामच्या मोठ्या बहिणीने स्वतःची परखड मत मांडली.
‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी घनःश्याम दरवडे आणि त्याची मोठी बहीण विद्याने संवाद साधला. यावेळी घनःश्यामच्या बहिणीला विचारलं गेलं की, बिग बॉसच्या टीमकडून जेव्हा विचारणा झाली तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? यावर घनःश्यामची बहीण उत्तर देत म्हणाली, “बिग बॉसच्या टीमचा कॉल घनःश्यामकडेच आला होता. श्यामने आम्हाला सांगितलं, बिग बॉसच्या टीमकडून कॉल आलेला आहे मी जाणार आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाने नकार दिला होता. कारण त्याच्या वैद्यकीय समस्या होत्या. त्याला गोळ्या आणि इंजेक्शन सुरू होती. त्यामुळे आम्हाला असं झालं होतं की, कुटुंबापासून दूर गेल्यानंतर एवढी काळजी कोण करणार?”
पुढे विद्या म्हणाली, “तो दौर-कार्यक्रमाच्या दरम्यान गोळ्या व्यवस्थित खात नाही. सारखं सांगावं लागतं खा-खा. त्यामुळे आम्ही नाही म्हणालो होतो. आपल्याला नाही जायचं आहे. काय जी रिअॅलिटी आहे ती बाहेर दाखवू या आपण, त्यासाठी शोची गरज नाही. जे रिअल आहे बाहेर दिसत आहे.”
“मग त्याने आम्हाला खूप समजवलं. जाऊ द्या, माझी इच्छा आहे. मग आम्ही मान्यता दिली. त्यानंतर पुण्यात वगैरे मिटींग झाली. बिग बॉसने त्याची खूप छान काळजी घेतली. त्याचा आम्ही विचार देखील केला नव्हता. आमच्यापेक्षाही जास्त त्याला जपलं,” असं घनःश्यामची बहीण म्हणाली.
हेही वाचा – Video: धनंजय पोवारची ‘ती’ कृती पाहून भारावल्या आई आणि पत्नी, ‘बिग बॉस’ना सुचवला एक नवा टास्क
दरम्यान, बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर घनःश्याम म्हणाला होता की, मी सहा आठवडे घरात होतो आणि माझा प्रवास खूप चांगला होता. खरंतर, मी खऱ्या आयुष्यात जसा आहे अगदी तसाच घरात राहिलो…एकदम रिअल राहण्याचा मी प्रयत्न केला. या शोमध्ये खोटं वागून मला बाहेर यायचं नव्हतं.