छोट्या पडद्यावरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकताच रणदिवेंच्या घरचा संगीत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने खास उपस्थिती लावली होती. आता सर्वत्र ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी या दोघांचा महाकेळवण सोहळा पुण्यात पार पडला आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन ऐश्वर्या-सारंगच्या महाकेळवण सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, उदय नेने, प्रतीक्षा मुणगेकर हे कलाकार उपस्थित होते. याशिवाय ऐश्वर्या म्हणजेच प्रतीक्षा मुणगेकर आणि जानकीची भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदे यांची अनोखी जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
जानकी ऐश्वर्याला उद्देशून म्हणते, “अगं अगं जाऊबाई…माझ्या धाकट्या दीराला फसवलंस का गं? का गं? का गं?” तिला प्रत्युत्तर देण्यासाठी ऐश्वर्या म्हणते, “अगं अगं जाऊबाई डिफेक्टिव्ह पिस पदरात दिलास का गं? का गं? का गं?” यांची जुगलबंदी ऐकून सभागृहात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
‘स्टार प्रवाह’च्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. हळद, मेहंदी आणि संगीत पार पडल्यानंतर अखेर विवाहसोहळ्याचा तो क्षण जवळ आलाय. ऐश्वर्याचं लग्न सारंगबरोबर होणार की सौमित्रबरोबर याची उत्सुकताही क्षणाक्षणाला वाढतेय. हळद, मेहंदी आणि संगीत सोहळ्यातल्या लक्षवेधी लूकनंतर आता विवाहसोहळ्यात रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबाने पारंपरिक पोशाखाला पसंती दिली आहे. याशिवाय ऐश्वर्या आणि जानकीने नऊवारी साडी आणि पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांना विवाहसोहळ्यात पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. हा विशेष भाग १४ मे रोजी प्रसारित करण्यात येणार आहे.
हेही वाचा : चार वर्षांनी भारतात परतलेली मृणाल दुसानिस सध्या काय करते? म्हणाली, “ठाण्याला शिफ्ट होऊन…”
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये रेश्मा शिंदे आणि भक्ती देसाईसह सुमीत पुसावळे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, प्रतिक्षा मुणगेकर, नयना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.