तुळशीच्या विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळे सध्या बरेच कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेला अभिनेता निखिल राजशिर्केचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. चैत्राली मोरे हिच्याशी निखिलची लग्नगाठ बांधली गेली. त्यानंतर अलीकडेच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुलचा भाऊ अखिलेश भगरे विवाहबद्ध झाला. अखिलेशने वैष्णवी जाधव हिच्याशी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आता लवकरच मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. तिच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.
मराठी मालिकाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिच्या मालिकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी तिने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं. पुण्यातील कोथरुड येथे तिने स्वतःचं ज्वेलरी स्टोअर उघडलं. आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री कोण असेल? हे आतापर्यंत ओळखलंच असेल.
लवकरच बोहल्यावर चढणारी ही मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी, तिसरी कोणी नसून रेश्मा शिंदे आहे. ‘रंग माझा वेगळा’नंतर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी रेश्मा लवकरच लग्न करणार आहे. तिच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेता सुयश टिळकने रेश्मा शिंदेच्या केळवणाचे फोटो शेअर केले होते. सुयशने रेश्माला शुभेच्छा देत केळवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. पण काही वेळानंतर सुयशने ती पोस्ट डिलीट केली. मात्र, रेश्माच्या केळवणाचे फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण केलं. या केळवणाला रेश्माच्या जवळचे कलाकार मित्रही उपस्थित होते. हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, शाल्मली तोळ्ये, अनघा भगे, ऋतुजा बागवे, सुयश टिळक, अंबर गणपुळे अशा बऱ्याच कलाकारांनी एकत्र येऊन रेश्माचं केळवण केलं.
दरम्यान, रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी भूमिका प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस पडली आहे. याआधी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत तिने साकारलेली दीपा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. याशिवाय रेश्माने ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘लगोरी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने मराठीसह हिंदी मालिकाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd