‘घरोघरी मातीच्या चुली'(Gharoghari Matichya Chuli)मध्ये सध्या ट्विस्ट येताना दिसत आहेत. हृषिकेश व जानकी पुन्हा त्यांच्या घरी परतत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत होताना दिसत आहे. ऐश्वर्याने कारस्थान करीत जानकी व हृषिकेशला घराबाहेर जाण्यास भाग पाडले होते. हृषिकेश व जानकी यांनी घराबाहेर पडून त्यांचे एक वेगळे विश्व निर्माण केले. शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी एक नवीन अॅप बनवले. ऐश्वर्या व सारंगच्या कट-कारस्थानांना बळी न पडता, ‘श्री व सौ’ या स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी आपल्या नावावर केले. संपूर्ण गावाचा त्यांना पाठिंबा असल्याचे पाहायला मिळते. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde)ने जानकीची भूमिका साकारली आहे. तर, हृषिकेश ही भूमिका सुमित पुसावळेने साकारली आहे. आता रेश्मा तिच्या मालिकेमुळे नाही तर तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे.
रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी दिसत आहे. ऋतुजाने मालिकेत अवंतिका ही भूमिका साकारली आहे, जी जानकीची जाऊ आहे. व्हिडीओमध्ये दोघींनी एका गाण्यावर अभिनय केला आहे. त्यामध्ये ऋतुजा लहान बहीण, तर रेश्मा मोठी बहीण झाली आहे. ऋतुजा तिला काहीतरी सांगत आहे; मात्र रेश्मा तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाते. या व्हिडीओवर मोठी बहीण विरुद्ध लहान बहीण, असे लिहिले आहे.
याबरोबरच, सोशल मीडिया, फॅशन सेन्स, कोणावर विश्वास ठेवायचा, आयुष्याचे धडे, नवीन तंत्रज्ञान यांबाबत लहान बहीण मोठ्या बहिणीला शहाणपणा शिकवताना, असे या व्हिडीओवर लिहिले आहे. या व्हि़डीओमध्ये सजन मेरे सतरंगिया हे गाणे ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रेश्मा शिंदेने ‘तुमच्याकडेपण असंच असतं का? घरोघरी मातीच्या चुली’, अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमधील दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या अनोख्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रेश्मा व ऋतुजाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी दोघींचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “खूप छान.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “दुसरे शिकवणारे बरेच जण असतात”, असे लिहित हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हो आमच्याकडे हीच स्थिती आहे.” एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “मोठी बहीण नेहमी दुर्लक्ष करते” अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

चाहत्यांबरोबरच काही कलाकारांनीदेखील कमेंट्स केल्या आहेत. स्वत: ऋतुजा कुलकर्णीने कमेंट करीत लिहिले, “हिचं मी काय करू? माझ्यावर प्रेम करते. त्यामुळे मारूही शकत नाही.” अभिज्ञा भावेने लिहिले, “तू एरवी अशी दुर्लक्ष करतेस.” त्यावर रेश्माने “गमतीत गप बसा ओ”, असे लिहिले आहे. अक्षय वाघमारे, साक्षी गांधी या कलाकारांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.




दरम्यान, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.