रेश्मा शिंदे व सुमित पुसावळे यांच्या प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली(Gharoghari Matichya Chuli) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे पाहायला मिळते. रेश्मा शिंदेने जानकी ही भूमिका साकारली असून, हृषिकेश ही भूमिका सुमित पुसावळेने साकारली आहे. घरोघरी मातीच्या चुली’मध्ये सध्या ‘श्री व सौ’ अशी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जानकी व हृषिकेश, ऐश्वर्या व सारंग, तसेच सौमित्र व त्याची पत्नी सहभागी झाले आहेत. अनेक दिवसांपासून ही स्पर्धा सुरू असून, स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसते. ऐश्वर्याने सारंगला तिच्या कट-कारस्थानामध्ये सामील केले आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी ती प्रत्येक फेरीत काही ना काही कारस्थान करत असल्याचे दिसते. तसेच जानकी व हृषिकेश या स्पर्धेतून बाहेर पडावेत यासाठी ती प्रयत्न करत असते. हृषिकेश व जानकी हे खेळातून बाहेर पडले आहेत. मात्र, खेळात ट्विस्ट असून लकी ड्रॉ द्वारे एका वाइल्ड कार्ड स्पर्धक जोडीला स्पर्धेत पुन्हा प्रवेश मिळणार आहे. जानकी व हृषिकेशची खेळात परतू नयेत म्हणून ऐश्वर्या त्यांच्या नावाची चिठ्ठी फाडण्यासाठी सारंगच्या मदतीने तिथे जाते. मात्र, तिथे वेळीच वॉचमन येतो. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्याला धक्का बसणार…
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. आता या स्पर्धेचा शेवटचा टप्पा आला असून, त्यामध्ये नेमके काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सारंग-ऐश्वर्या व हृषिकेश-जानकी पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. महाअंतिम फेरीत या दोन जोड्यांमध्ये स्पर्धा आहे. सारंग व हृषिकेश चाके असलेल्या लाकडाच्या एका छोट्या रथावर बसले आहेत. जानकी व ऐश्वर्या यांना तो रथ रशीने ओढत शेवटपर्यंत न्यायचा आहे. दोघीही जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. पुढे पाहायला मिळते की, हृषिकेश बसलेला रथ एका ठिकाणी थांबला आहे. जानकी तो ओढण्याचा प्रयत्न करते. ऐश्वर्या व सारंग हे पुढे जातात. ऐश्वर्याला ती जिंकल्याचा आनंद होतो. ती विचित्र हसत जिंकले, असे म्हणते आणि लोकांना टाळ्या वाजवण्यास सांगते. सगळे तिच्याकडे खिन्न नजरेने बघत असतात. ऐश्वर्या मागे वळून पाहते आणि मग तिच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे दिसत आहे. त्यानंतर जानकी व हृषिकेश एकमेकांच्या हातात हात देतात आणि तिच्याकडे बघत स्मित करताना दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाहने ‘काय घडलं असेल शेवटच्या क्षणी…?’, अशी कॅप्शन दिली आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’चा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी, “ऐश्वर्याची दोरी तुटली आणि सारंग मागेच राहिला”, “याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स”, “ऐश्वर्या वेडी झाली”, “सारंग पडणारच होता. मूर्ख ऐश्वर्या ३ पायांच्या शर्यतीमध्येपण असेच त्याला फरपटत नेत होती”, “ऐश्वर्या आणि सारंग हरायला तयार आहेत”, “ऐश्वर्याचा आगाऊ आत्मविश्वास”, अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.



दरम्यान, या मालिकेत आशुतोष पत्की, सविता प्रभुणे, आरोही सांबरे, प्रमोद पवार, उदय नेने, प्रतीक्षा मुणगेकर, नयना आपटे, अक्षय वाघमारे, भक्ती देसाई असे प्रसिद्ध कलाकार या मालिकेत काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापैकी काही कलाकारांनी सकारात्मक, तर काहींनी नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत’घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आता पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.