‘घरोघरी मातीच्या चुली’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. जानकी व हृषिकेशची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. या मालिकेत सातत्याने नाट्यमय घडामोडी घडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याच्या कट-कारस्थानामुळे जानकी व हृषिकेश हे घराबाहेर पडले आहेत. आता सारंगदेखील ऐश्वर्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असल्याचे दिसत आहे. तोदेखील इतरांना फसवून खोटे वागत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता श्री व सौ या स्पर्धेत जानकी ऐश्वर्याचा खोटेपणा सर्वांसमोर उघड करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत येणार ट्विस्ट

स्टार प्रवाहने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये श्री व सौ ही स्पर्धा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सारंग व ऐश्वर्या दोघांच्याही कानावर हेडफोन आहेत. त्यामध्ये मोठ्या आवाजात गाणी सुरू आहेत. सारंग जे सांगेल, ते ऐश्वर्याने ओठांच्या हालचालीवरून समजून ते वाक्य, तसेच मोठ्याने म्हणायचे आहे. ऐश्वर्याची एकापाठोपाठ सर्वच वाक्ये बरोबर आल्यानंतर तिथेच बसलेल्या जानकीला संशय येतो. ती हृषिकेशला म्हणते, “हेडफोन्समध्ये एवढ्या मोठ्याने म्युझिक सुरू असतानासुद्धा हिला सगळं कसं कळतं?” ऐश्वर्याचा खोटेपणा उघड करण्यासाठी ते ऐश्वर्याच्या वडिलांचे नाव घेते. वडिलांचे नाव ऐकताच ऐश्वर्या आनंदाने अरे डॅडा आले, असे म्हणत वळते. जानकी तिला विचारते. ऐकू आलं तुला? पुढे जानकी म्हणते की, याचाच अर्थ ती सरळ चीटिंग करतेय, असाच होतो ना?

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जानकी ऐश्वर्या जवळ येते आणि तिचे हेडफोन काढत म्हणते की, तुझे कान आहेत ना जागेवर? की कापले देवबाप्पानं? खोटं बोललीस म्हणून? ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचा प्रोमो शेअर करताना, ‘ऐश्वर्याचा खोटेपणा जानकी सगळ्यांसमोर उघड करणार’, अशी कॅप्शन दिली आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत श्री व सौ या स्पर्धेत कोण जिंकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, छावा चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विकी कौशल या मालिकेत दिसणार असल्याने, मालिकेची मोठी चर्चा सुरू आहे. आता विकी कौशलबरोबरच्या शूटिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

Story img Loader