‘घरोघरी मातीच्या चुली'(Gharoghari Matichya Chuli) या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे व अभिनेता सुमित पुसावळेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. प्रतीक्षा मुणगेकरने ऐश्वर्या ही भूमिका साकारली आहे. या मालिकेत रेश्मा शिंदेने जानकी रणदिवे ही भूमिका साकारली आहे. तर सुमित पुसावळेने हृषिकेश रणदिवे ही भूमिका साकारली आहे. तर प्रतीक्षा ऐश्वर्या रणदीवे ही भूमिका साकारताना दिसत आहे. जानकी तिच्या कुटुंबासाठी आदर्श सूनेची सर्व कर्तव्ये निभावते. तर ऐश्वर्या सतत तिला त्रास देते. कट-कारस्थान करते. तिने तिच्या सासऱ्यांना नानांना पायऱ्यांवरून खाली ढकलले होते आणि हा अपघात जानकीने घडवून आणल्याचे सांगतिले होते. त्यानंतर जानकीला घराबाहेर काढले होते.

जानकीला घराबाहेर काढल्यानंतर हृषिकेशदेखील घराबाहेर पडत जानकीबरोबर वेगळीकडे संसार थाटला होता. त्यानंतर त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. काही दिवसांपूर्वी जानकी आणि हृषिकेश पुन्हा घरी आले. त्यानंतर नानांना किडनॅप करण्यात आले. तसेच त्यांचे निधन झाले असून त्यांच्या मृत्यूस हृषिकेशला जबाबदार असल्याचे ऐश्वर्याने सर्वांना पटवून दिले. त्यानंतर हृषिकेशवर खटलादेखील चालू होता. यादरम्यान जानकी नानांना शोधून कोर्टात आणत असल्याचे पाहायला मिळाले. आता या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

जानकी करणार ऐश्वर्याची हकालपट्टी

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जानकी ऐश्वर्याला रागात म्हणते, “हृषिकेशवर खोटा आळ घेतलास, नानांना ढकललंस, बास आता तुझ्या पापांचा घडा भरला आहे,ऐश्वर्या”, असे म्हणत जानकी ऐश्वर्याला ओढत घराबाहेर नेते. तितक्यात ऐश्वर्याचे वडील तिथे येतात. जानकी तिच्या हातात साडी ठेवते. तिच्या वडिलांना म्हणते, “साडी चोळी देऊन पाठवणी करतेय तिची. पुन्हा जर वाकडी नजर करून आमच्या घरावर वाईट नजर टाकली तर पाठवणी घराबाहेर नाही तर तुरूंगात करेन”, अशा कडक शब्दात जानकी ऐश्वर्याच्या वडिलांना सुनावते.

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने जानकी करणार ऐश्वर्याची घरातून हकालपट्टी अशी कॅप्शन दिली होती. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “चांगलं केलं त्या ऐश्वर्या ला तसचं पाहीजे जानकी ताई लय भारी केलं”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मालिकेतला सर्वात चांगला दिवस”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह!जानकी ग्रेट”, एका नेटकऱ्याने जानकीचे कौतुक करत लिहिले, “ऐश्वर्या आणि तिच्या डॅडाला पोलीस च्या कडे द्यायला हवं होतं”, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहे.

आता घरोघरी मातीच्या चुली मध्ये पुढे काय घडणार, ऐश्वर्या रणदिवे कुटुंबात पुन्हा परतण्यासाठी काय करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.