Girija Prabhu Get Injured: काही दिवसांपासून ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेची मोठी चर्चा सुरू आहे. २८ एप्रिल २०२५ पासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.
कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता मंदार जाधव, सुकन्या मोने हे कलाकारदेखील या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या मालिकेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री गिरिजा प्रभूला काठी चेहऱ्यावर लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
मालिकेच्या पहिल्या एपिसोडचे शूटिंग करताना गिरिजा प्रभूला झाली दुखापत
स्टार प्रवाह वाहिनीकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, लाठीकाठीच्या सरावादरम्यान अभिनेत्रीला दुसऱ्या व्यक्तीची काठी लागते. त्यामुळे तिच्या चेहऱ्याला थोडी सूज आली. ती चेहऱ्याला शेकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणाली, “कोण होतीस तू काय झालीस तू या मालितेचे शूटिंग सुरू आहे. सकाळपासून आम्ही जत्रेचा सीक्वेन्स शूट करतोय. या जत्रेत लाठीकाठीचा सीक्वेन्स शूट करताना मला काठी लागली आणि त्यामुळे सूज आली. पहिल्या एपिसोडची ही आठवण आहे. अशा गोष्टी होत असतात; पण छान वाटतंय. मजा येतेय. काहीतरी वेगळं करतेय. मला वाटतं की, आपण एखाद्या कलाकृतीचा आनंद घेतो, तेव्हा ती नक्कीच प्रेक्षकांना आवडते.”
याबरोबरच या नवीन मालिकेच्या शूटिंगचे काही पडद्यामागचे क्षणही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. याआधी अभिनेत्री गिरीजा प्रभू व मंदार जाधव हे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत एकत्र दिसले होते. या मालिकेला मोठे यश मिळाले. कलाकारांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता या नवीन मालिकेतून ही लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्यांची ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यानस मंदार जाधव,गिरीजा प्रभू, सुकन्या मोने यांच्याबरोबरच वैभव मांगले, अमित खेडेकर व अमृता माळवदकर हे कलाकारही कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.