‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी नवी कोरी मालिका घेऊन येत आहे यामध्ये मंदार जाधव व गिरीजा प्रभू ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.त्यानिमित्त वाहिनीने मालिकेतील कलाकारांसह जोरदार प्रमोशन केल्याचं पाहायला मिळालं. अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नुकताच त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री गिरिजा प्रभूला काही गमतीशीर प्रश्न विचारण्यात आले. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला ‘कोण होतीस तू काय झालीस तू!’ या नव्या मालिकेची गोष्ट कोकणातली. ‘मग बघूया तर या कलाकारांना आपले सहकलाकार कोकणातील कोणत्या पदार्थासारखे वाटतात…’ असं कॅप्शन देण्यात आली आहे.
त्यामध्ये गिरिजानंही विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं.
गिरिजानं सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली; परंतु त्यातील तिच्या एका उत्तरानं मात्र लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे गिरिजाला “फणस या पदार्थासारखं तुला कोण वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला होता.” त्यावर तिने “फणस.. वैभवसर. कारण- सगळ्यांना ते काटेरी वाटतात; पण आतून खरंच ते तसे नाही आहेत. ते फार प्रेमळ आहेत. फार गोड आहेत”, असं उत्तर दिलं आहे. तर या मालिकेत गिरिजा व वैभव मांगले बाप-लेकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मलिकेत गिरिजा कावेरी नावाच्या मुलीचं पात्र साकारताना दिसणार आहे. कावेरी ही कोकणातली असून स्वभावानं ती इतरांची काळजी घेणारी, माया करणारी; पण कणखर असल्याचं पाहायला मिळतं.
त्यासह ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री सुकन्या मोने, वैभव मांगले, मंदार जाधव, गिरिजा प्रभू, अमित खेडेकर, अमृता माळवदकर यांसारखी कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहेत. मालिकेच्या प्रोमोनुसार कथेमध्ये पुढे मोठं वळण येणार असून, तिथून कावेरीची खरी कथा सुरू होणार असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे मालिकेची कथा नेमकी कशी पुढे जाईल, यश व कावेरी म्हणजेच गिरिजा व मंदार यांची प्रेमकहाणी कशी फुलेल हे पाहणं रंजक ठरेल.