Gharoghari Matichya Chuli Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. सौमित्रशी लग्न न झाल्याचा बदला ऐश्वर्या सातत्याने रणदिवे कुटुंबाशी घेताना दिसत आहे. आतापर्यंत हृषिकेश आणि जानकी विरोधात ऐश्वर्याने अनेक डाव रचले. एवढंच नाहीतर ऐश्वर्याने चालाखीनं हृषिकेश आणि जानकीला घराबाहेर काढलं. पण, जानकी नेहमी ऐश्वर्याला जशासतसं उत्तर देताना दिसली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी ‘श्री आणि सौ’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतही ऐश्वर्याने जानकीला हरवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण अखेर सत्याचा विजय होतो तेच झालं. हृषिकेश आणि जानकी ‘श्री आणि सौ’ स्पर्धा जिंकले. आता प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत आहेत. तो क्षण आला आहे. हृषिकेश आणि जानकीचं वाजतगाजत, सन्मानाने रणदिवेंच्या घरात स्वागत केलं जाणार आहे. यासाठीच ‘स्टार प्रवाह’च्या जुन्या मालिकेतील कलाकारांची खास ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये एन्ट्री झाली आहे. याचा जबरदस्त प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये आदेश बांदेकर हृषिकेशला फेटा बांधताना दिसत आहेत. यावेळी आदेश बांदेकर यांच्या पत्नी, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर पाहायला मिळत आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर निर्माते आहेत. या दोघांव्यतिरिक्त ‘स्टार प्रवाह’च्या परिवारातील जुने चेहर पाहायला मिळत आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकलेली गौरी, नित्या म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू हृषिकेश आणि जानकीच्या गृहप्रवेशावेळी ढोल वाजताना दिसत आहे. याशिवाय ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील जीजीअक्का म्हणजे अभिनेत्री अदिती देशपांडे आणि ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील बाबी आत्या म्हणजे अभिनेत्री सारिका निलाटकर-नवाथे ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हृषिकेश आणि जानकीच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. दोघंही या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत. प्रेक्षकांना ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा गृहप्रवेशाचा प्रोमो खूप आवडला आहे. “मालिकेला खरा रंग आला”, असं म्हणताना नेटकरी दिसत आहेत.