Girish Oak : २०१९ मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. आता मतदानाला अवघे चार दिवस उरले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख सहा पक्षांची लढत होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यासह विविध आश्वासनंही दिली जात आहेत. अशातच ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी शेअर केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

अलीकडच्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सामाजिक तसेच राजकीय स्थितीवर भाष्य करताना दिसतात. यापूर्वी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय कवितेची चर्चा झाली होती. यानंतर उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सिनेकलाकारांनी राजकीय झेंडे हातात घेतल्याचं देखील पाहायला मिळालं. आता डॉ. गिरीश ओक यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पडलेले दोन ‘भाबडे’ प्रश्न पोस्टच्या माध्यमातून विचारले आहेत.

हेही वाचा : “त्याने मराठी इंडस्ट्रीत सर्वात पहिली गटबाजी सुरू केली”, सविता मालपेकरांनी थेट सांगितलं नाव; म्हणाल्या, “मला काय देणंघेणं…”

गिरीश ओक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दोन प्रश्न विचारले आहेत. यापैकी पहिला प्रश्न पक्षांकडून देण्यात येणारी आश्वासनं या संदर्भातला आहे. तर, दुसरा प्रश्न विविध ठिकाणी गाड्यांमध्ये पकडण्यात येणाऱ्या पैशांसंदर्भातील आहे.

अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची पोस्ट

मला पडलेले दोन भाबडे प्रश्न

पहिला

एक पार्टी १५०० देतेय दुसरी ३००० देणार म्हणतेय इतरही बरीच पैशांची आश्वासनं दिली जात आहेत. पण, हे देतायत्/देणार कुठून आपला टोल, आयकर, जीएसटी मधूनच नं?
मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी.

दुसरा

आणि हे जे एटीएमच्या किंवा इतर गाड्यांमध्ये पैसे पकडले जात आहेत ते असे ऑड संख्येत म्हणजे १ कोटी २७ लाख किंवा २ कोटी ७० लाख असे कसे आहेत. देणाराही असे का देतोय आणि घेणाऱ्यालाही असे कसे हवे आहेत. की हे वरचे पैसे म्हणजे पोचवणाऱ्यांचा पोचवण्याचा मेहनाताना आहेत की पोचवताना ते पोचवणारेच लंपास करत आहेत किंवा पकडणारे थोडे लंपास करून उरलेलेच सापडले असं सांगतायत.
कोणी सांगेल का मला?

हेही वाचा : फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?

Girish Oak
गिरीश ओक यांची पोस्ट ( Girish Oak )

दरम्यान, गिरीश ओक ( Girish Oak ) यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया देत मतं मांडली आहेत. एका युजरने “सर तुमचे प्रश्न रास्त आहेत पण त्याला उत्तर मिळणे दुरापास्त आहे.” अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एका युजरने, “प्रश्न मांडलेच पाहिजेत, विचारले पाहिजेत. माणूस म्हणून – नागरिक म्हणून भूमिका घेणारे कलाकार कमीच आहेत. तुम्हाला धन्यवाद!” अशी प्रतिक्रिया देत त्यांचं या पोस्टसाठी कौतुक केलं आहे.

Story img Loader