Girish Oak : राज्यात विधानसभेसाठी बुधवारी ( २० नोव्हेंबर ) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दिग्गजांच्या सभा राज्यात विविध ठिकाणी पार पडल्या होता. अखेर सोमवारी सायंकाळी सहा वाजता या प्रचाराचा शेवट झाला असून आता बुधवारी मतदान होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार याचा निर्णय २३ नोव्हेंबरला होणार आहे. यंदा निवडणूक प्रचाराला दिग्गज नेत्यांसह मराठी कलाविश्वातील काही स्टार प्रचारक सुद्धा उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आले होते. तसेच, अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकार सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतात.

ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी नुकतीच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अनुसरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी मतदारांना दोन ‘भाबडे’ प्रश्न विचारले होते. यातील पहिला प्रश्न पक्षांकडून देण्यात येणारी आश्वासनं या संदर्भातला आहे. तर, दुसरा प्रश्न विविध ठिकाणी गाड्यांमध्ये पकडण्यात येणाऱ्या पैशांसंदर्भातील आहे. आता गिरीश ओक यांची नव्याने शेअर केलेली पोस्ट सुद्धा चर्चेत आली आहे. यामध्ये या ज्येष्ठ अभिनेत्याला आणखी एक ‘भाबडा’ प्रश्न पडला आहे. या पोस्टबद्दल जाणून घेऊयात…

हेही वाचा : “एक पक्ष १५०० देतोय, दुसरा ३ हजार देणार, पण…”, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश ओक यांनी विचारले दोन ‘भाबडे’ प्रश्न; पोस्ट चर्चेत

ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची पोस्ट

मला पडलेला अजून एक ‘भाबडा’ प्रश्न ( Girish Oak )

चित्रपटांना, नाटकांना सेन्सॉर आहे तसं या निवडणूक प्रचार भाषणांना नाही का किंवा का नाही?

अहो सध्या फार पंचाईत होते. मुलांबरोबर कुठल्याही बातम्यांच्या चॅनेलवर ही भाषणं बघताना, ऐकताना… त्या भाषणांमधल्या नको नको त्या शब्दांचे, हातवाऱ्यांचे अर्थ विचारतात मुलं. त्यापेक्षा चित्रपटाच्या आधी जसं पेरेंटल गायडंस १३ + १६ + १८ येतं तसं निवडणूक आयोगाने या भाषणांच्या आधी टाकलं तर बरं होईल नाही का?

का तर आम्हाला तर कळलेलंच आहे की कुठले राजकीय ज्येष्ठ लोकप्रतिनिधी किती अनपार्लमेंटरी बोलतात… पण, हे मुलांनाही कळायला नको म्हणून हो…

एक सुजाण नागरिक पेरेंटल जबाबदारी

दरम्यान, या पोस्टवर गिरीश ओक यांच्या चाहत्यांसह सामान्य लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तुमचं अगदी बरोबर आहे”, “सच्चा मतदार… आजपर्यंत न पडलेला प्रश्न मांडल्या बदल खूप प्रेम धन्यवाद”, “एकदम टू द पॉईंट बोला आपने… पण, दुर्दैवाने कारवाई करणार कोण” अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Girish Oak
गिरीश ओक यांची पोस्ट ( Girish Oak )

दरम्यान, गिरीश ओक ( Girish Oak ) यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सूर्या दादाच्या सासऱ्यांची म्हणजेच डॅडींची भूमिका साकारत आहेत.