‘मोनिका’, ‘ओह माय डार्लिंग’, ‘महारानी’ या चित्रपट आणि वेबसीरिजनंतर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हुमा कुरेशी एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘मॅडनेस मचाएंगे- इंडिया को हसाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्ये मुख्य परीक्षक म्हणून ती जबाबादारी सांभाळत आहे. कपिल शर्माचा बहुचर्चित शो आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असल्याने याजागी ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं आहे. या शोमध्ये कुशल बद्रिके, हेमांगी कवी, गौरव मोरेसारखे मराठी कलाकार सुद्धा झळकत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रम सध्या करण जोहरमुळे चर्चेत आला होता. बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेता व निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करणने नुकतीच सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत या कार्यक्रमाविषयी नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये करणची नक्कल करण्यात आली होती. २५ वर्षानंतरही लोक असे थट्टा करतात तेव्हा राग येत नाही वाईट वाटतं असं करण म्हणाला होता. यानंतर संबंधित अभिनेत्याने करण जोहरची माफी मागितली होती. मात्र, आता या कार्यक्रमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा : Met Gala : तब्बल १९६५ तास, १६३ कारागीर अन्…; मेट गालामध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज! साडीने वेधलं लक्ष

‘इ-टाइम्स’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मॅडनेस मचाएंगे’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कमी टीआरपीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. वाहिनीच्या डेव्हलपमेंट टीममधील एका जवळच्या व्यक्तीने ही माहिती ‘इ-टाइम्स’बरोबर शेअर केली आहे. आता लवकरच ‘मॅडनेस मचाएंगे’ शोची जागा एक नवीन शो घेणार आहे. वाहिनीवर सुरू होणाऱ्या नव्या कार्यक्रमात प्रेक्षकांना नेमकं काय काय पाहायला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर प्रियाने फोडलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य! अर्जुनने थेट केला चैतन्यला फोन, पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

दरम्यान, ‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमात झळकणारे कुशल बद्रिके, हेमांगी कवी, गौरव मोरे हे मराठमोळे कलाकार सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. मराठीसह हिंदी टेलिव्हिजनसृष्टीत या कलाकारांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका भागात गौरव मोरेने चक्क बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हिला इम्प्रेस केलं होतं. ‘तू हैं मेरी किरण’ या गाण्यावर थिरकत अभिनेत्याने ‘डर’ चित्रपटातील शाहरुख खानची भूमिका रिक्रिएट केली होती. परंतु, कमी टीआरपीमुळे आता लवकरच हा कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guarav more kushal badrike madness machayenge being pulled down due to low trp says reports sva 00