Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte : बिग बॉस हिंदीच्या १८ व्या पर्वात प्रेक्षकांचे १० दिवस मनोरंजन केल्यानतंर वकील गुणरत्न सदावर्ते बाहेर पडले आहेत. या १० दिवसांत त्यांनी त्यांच्या कामाबद्दल, अनुभवाबद्दल इतर स्पर्धकांना अनेक किस्से सांगितले होते. मात्र अचानक त्यांना बिग बॉसमधून बाहेर यावं लागलं. घरातून बाहेर आल्यावर त्यांनी पहिली मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी शोमधून अचानक बाहेर पडण्याचं कारण सांगितलं आहे.
‘बिग बॉस हिंदी १८’ मधून बाहेर पडण्याचं कारण काय आणि प्रवास कसा होता असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात. ‘टेली रिपोर्टर’शी बोलताना सदावर्ते म्हणाले, “कोर्टाकडून बोलावणं आलं, त्यामुळे मी बिग बॉसमधून बाहेर आलो. एका महत्त्वाच्या केसच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर हजर राहावे लागणार आहे. जयश्री पाटील यांच्या नावाने मराठा आरक्षणासंदर्भात जी कोर्टात याचिका केली आहे, त्याच्या सुनावणीसाठी मला बाहेर यावं लागलं. मोठ्या आदराने मला या केसच्या सुनावणीसाठी बाहेर पाठवण्यात आलं.”
हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंची अचानक शोमधून एक्झिट! नेमकं काय घडलं? ते बिग बॉसच्या घरात परतणार का? वाचा
गुणरत्न सदावर्ते यांचं कोर्टातील प्रकरण नेमकं काय?
गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashri Patil) यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील काही याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. मात्र मुख्य याचिकाकर्ते सदावर्ते या सुनावणीला उपस्थित नव्हते. या सुनावणीला ते गैरहजर असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीत महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ महाराष्ट्र सरकारची बाजू मांडतील. तसेच पुढील सुनावणीदरम्यान कोणत्याही याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असंही खंडपीठाने स्पष्ट केलंय.
हेही वाचा – Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते बिग बॉस हिंदीमध्ये परत जाणार की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. गेले १० दिवस त्यांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं, त्यामुळे बिग बॉसचे निर्माते त्यांना परत शोममध्ये आणण्यास उत्सुक आहेत, अशा चर्चा आहेत.